Vipul Kadam Guhagar : विधानसभा निवडणुकीसाठी जेमतेम दीड महिना उरला असून सर्व पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. आपापल्या वाट्याला येणाऱ्या मतदारसंघात उमेदवार कोण असेल याचीही चाचपणी सुरू झाली आहे. त्यावरून नाराजीनाट्यही समोर येत आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात विपुल कदम यांचं नाव संभाव्य उमेदवार म्हणून पुढं आल्यामुळं शिंदे यांच्या पक्षात नाराजीनाट्य रंगलं आहे. पक्षाचे नेते रामदास कदम यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच इशारा दिला आहे.
गुहागर विधानसभा मतदारसंघात सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव हे आमदार आहेत. महायुतीमध्ये भाजप व शिंदेंच्या शिवसेनेमध्ये या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं विपुल कदम यांचं नाव निश्चित केल्याचं समजतं. विपुल कदम हे एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे आहेत. ते खेडमधील तळेगावचे रहिवासी आहेत. गुहागर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी अलीकडंच मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन विपुल कदम यांच्या नावाचा आग्रह धरला होता. त्या बैठकीत त्यांचं नाव निश्चित झाल्याचं समजतं. त्यानंतर कदम हे कामाला लागले आहेत. त्यांनी मतदारसंघातील नागरिकांसाठी धर्मवीर - २ चित्रपटाचे मोफत शो सुरू केले आहेत. मात्र यावरून रामदास कदम भडकले आहेत.
रामदास कदम हे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आहेत. त्यांना ही उमेदवारी मान्य नाही. विपुल कदम कोण आहेत? त्यांचा गुहागरशी संबंध काय आणि त्यांना उमेदवारी कशी मिळते,' असा सवाल त्यांनी केला आहे. एकनाथ शिंदे किंवा त्यांचे चिरंजीव हे आपला जवळचा नातेवाईक म्हणून त्यांना उमेदवारी देणार असतील आणि नवीन पायंडा पाडणार असतील तर ते शिवसैनिकांना रुचेल असं वाटत नाही, असं रामदास कदम म्हणाले.
शिवसैनिकांनी वर्षानुवर्षे काम केलंय, त्यांना बाजूला ठेवून केवळ नातेवाईक म्हणून एकनाथ शिंदे कुणाला आणणार असतील तर त्या उमेदवाराला शंभर टक्के पराभवाला सामोरं जावं लागेल, हे कुणाही ज्योतिषाकडं जाऊन पाहण्याची गरज नाही. त्या उमेदवाराशी माझा काडीचाही संबंध नसेल. मी गुहागरमध्ये पाय ठेवणार नाही, असं रामदास कदम यांनी ठणकावलं आहे. कदम यांच्या या इशाऱ्यानंतर एकनाथ शिंदे नेमका काय निर्णय घेतात याकडं आता पक्षाचं लक्ष लागलं आहे.