Baba Siddique Death: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत हत्या झाली. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्यांच्या मुंबई येथील मतदार संघाप्रमाणेच त्यांच्या बिहार राज्यातील गोपालगंज देखील शोकसागरात बुडाले आहे. बाबा सिद्दीकी हे मुंबईत राहत असले तरी त्यांची त्यांच्या मूळगावाशी नाळ तुटली नव्हती. त्यांनी त्यांच्या गावात अनेक विकास कामे केली होती. तसेच सामान्य नागरिकांना देखील त्यांनी मोलाची मदत केल्याने त्यांच्या गावी त्यांच्या मृत्यूची वार्ता ऐकून कोणाच्याही घरी चूलही पेटली नाही, अशी माहिती त्यांचे पुतणे गुफरान यांनी दिली.
अभिनेते सुनील दत्त यांच्यामुळे बाबा सिद्दीकी हे राजकारणात आले. त्यांचे मूळ गाव हे बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यामधील मांझागढ शेख टोली आहे. ५० वर्षांपूर्वी त्यांनी त्यांचे मूळगाव सोडून आजोबा अब्दुल रहीम यांच्यासोबत ते मुंबईत आले. मुंबईच्या वांद्रेत राहत असतांना त्यांनी विद्यार्थी दशेत असताना ते राजकारणात सक्रीय झाले. यानंतर त्यांचा प्रवास हा चढता राहिला. त्यांनी अनेक सामजिक कार्यात हिरीहिरीने सहभाग घेतला. आमदार तसेच राज्यमंत्री असतांना ते २००८ मध्ये व २०१८ मध्ये त्यांच्या मूळगावी गेले होते.
गेल्या ५० वर्षात त्यांनी त्यांच्या गावाची नाळ कधीही तुटू दिली नाही. विविध माध्यमातून त्यांनी त्यांच्या गावात विकासकामे राबवली. त्यांनी त्यांच्या गावात मोफत शिक्षण सुरु केले. मदरसे, कब्रस्तान व क्रिकेट प्रशिक्षण केंद्र देखील सुरू केले.
त्यांनी गरीब मुलींच्या विवाहाची देखील जबाबदारी घेतली. त्यामुळे त्यांच्या हत्येची बातमी ऐकल्यावर संपूर्ण गावाला मोठा धक्का बसला. संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले असून त्या दिवशी गावात एकाही घरात चूल पेटली नाही. गावातील असे एकही घर नव्हते की ज्या कुटुंबाला बाबा सिद्दिकी यांनी मदत केली नाही. ज्यांना मदतीची गरज असे तेव्हा त्या व्यक्तीच्या मदतीसाठी ते धावून जात होते. त्यामुळे आज त्यांच्या जण्याने गाव पोरके झाले अशी भावना गुफरान यांनी व्यक्त केली.
संबंधित बातम्या