खराब सिबिल स्कोअर आहे म्हणून एखाद्या बँकेने किंवा पतसंस्थेने कर्ज देण्यास नकार दिल्याचे आपण ऐकले असेल, परंतु सिबिलमुळे एकाद्याचे लग्न मोडल्याची ही बहुधा पहिलीच घटना असेल. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये हा प्रकार समोर आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एका तरुणाचे लग्न ठरले होते. लग्नाबाबत नवरदेवाचे कुटुंबीय आणि वधूच्या कुटुंबीयांमध्ये चर्चा सुरू असताना ही घटना उघडकीस आली. लग्नाची तारीख ठरवण्यासाठी दोन्ही बाजुची मंडळी जमली होती. लग्नाच्या इतर बाबींवर चर्चा करण्यासाठी दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना भेटण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर वधूच्या काकांनी नवरदेवाचा सिबिल स्कोअर तपासण्याची मागणी केली.
मुलीच्या काकांनी नवरदेवाचे पॅनकार्ड नंबर घेऊन त्याचा सिबिल स्कोअर तपासला. नवरदेवाचा सिबिल स्कोअर कमी असल्याचे आढळले. यानंतर मुलीकडील मंडळींनी लग्नास नकार दिला. मिळालेल्या माहितीनुसार, नवरदेवाच्या नावावर अनेक कर्जे असल्याचे कळताच वधूच्या कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी विविध बँकांकडून कर्ज घेतले होते. शिवाय त्याचा सिबिल स्कोअरही खूप कमी होता. कमी सिबिल स्कोअर दर्शवितो की त्या व्यक्तीचा आर्थिक इतिहास कमकुवत आहे. कर्जाची परतफेड करण्यात तो थकबाकीदार होता.
वधूच्या काकांनी सांगितले की, नवरदेव आधीच आर्थिक समस्यांनी वेढलेला आहे आणि तो आपल्या पत्नीला आर्थिक सुरक्षा देऊ शकणार नाही. त्यानंतर वधूच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीही हा निर्णय मान्य करत लग्नाचा प्रस्ताव रद्द केला.
सिबिल स्कोअर हा तीन अंकी क्रमांक आहे जो एखाद्या व्यक्तीच्या क्रेडिट इतिहासाचा सारांश देतो. तो ३०० ते ९०० पर्यंत असतो. उच्च सिबिल स्कोअर दर्शवितो की त्या व्यक्तीचे आर्थिक आयुष्य चांगले आहे. कमी स्कोअर उलट दर्शवितो. एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट इतिहास निश्चित करण्यासाठी सिबिल स्कोअरचा वापर केला जातो. तो वेळेवर कर्ज फेडू शकतो की नाही, हे तपासले जाते.
संबंधित बातम्या