Vasai teen kills mother : वसईच्या माजिवली देपिवली ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत महिला सदस्याचा कुऱ्हाडीने वार करत गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या महिलेचा खून तिच्या मुलानेच केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. चारित्र्याचा संशय घेऊन त्याने हे पाऊल उचलले आहे. ही घटना रविवारी (दि २०) रात्री १० च्या सुमारास घडली.
सुनिता सुनिल घोघरा (वय ३६) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सुनीता या ग्रामपंचायत सदस्य असून त्या माजिवली देपिवली येथे कुटुंबासोबत राहत होत्या. त्याच्या १७ वर्षीय मुलाला त्यांच्या चारित्र्यावर संशय होता. यामुळे त्याने त्यांचा खून केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनिता घोघरा वालीव परिसरात नोकरीला जात होत्या. रविवार सुट्टी असल्याने त्या घरी होत्या. रात्री जेवण करून त्या झोपायला गेल्या. यावेळी त्यांच्या अल्पवयीन मुलाने त्यांच्यावर कुऱ्हाडीने तीन वार केले. यात त्या गंभीर जखमी झाल्या. आरोपी यानंतर फरार झाला. थोड्या वेळाने सुनीता यांचे पती घरी आले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला त्यांनी बघितल्यावर ते हादरले. त्यांनी तातडीने त्यांना भिवंडी येथे रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारपूर्वी डॉक्टरांनी सुनीता यांना मृत घोषित केले. सुनीता यांचे पती यांनी या प्रकरणी मांडवी पोलिसांत तक्रार दिली. या घटनेचा तपास करतांना पोलिसांचा मुलावर संशय बळावला. त्याची चौकशी केली असता त्याने आईची हत्या केल्याचे कबूल केले. दरम्यान, आईच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्याने खून केल्याचे देखील पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून त्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. कायदेशीर कारवाई झालीवर त्याला बालसुधार गृहात पाठवले जाणार आहे.
संबंधित बातम्या