मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Employee Strike : कर्मचारी संपावर गेल्याने सामान्यांना मोठा मनस्ताप; सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट

Employee Strike : कर्मचारी संपावर गेल्याने सामान्यांना मोठा मनस्ताप; सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 14, 2023 02:42 PM IST

Employee Strike News : कर्मचारी संपाचा राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मोठा परिणाम दिसून आला आहे. कामकाज ठप्प झाल्यामुळं सामान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

Employee Strike For Old Pension Scheme In Maharashtra
Employee Strike For Old Pension Scheme In Maharashtra (HT)

Employee Strike For Old Pension Scheme In Maharashtra : शिंदे-फडणवीस सरकारसोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर राज्यातील कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आजपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई, कोल्हापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरातील प्रशासकीय कार्यालयं ओस पडली आहे. त्यामुळं शासकीय कामासाठी आलेल्या सामान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळं शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

पुण्यातील मुख्य कार्यालयासह सोलापूर, अकलूज, पिंपरी, बारामती, या आरटीओ कार्यालयातील तब्बल ८० कर्मचाऱ्यांनी संपात भाग घेत शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. याशिवाय कोल्हापुरात सरकारी, निमसरकारी, महापालिका आणि नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येनं संपात सहभाग घेतला आहे. विदर्भातील नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील, उपविभागीय अधिकारी कार्यालयातील तृतीय श्रेणी महसूल कर्माचारी संपात सहभागी झाले आहेत. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळं सामान्यांची कामं खोळंबली आहे. त्यामुळं राज्यातील प्रमुख शहरांतील सरकारी कार्यालयांमध्ये शुकशुकाट असल्याचं पाहायला मिळालं.

जुन्या पेन्शन योजनेवर फडणवीसांचं स्पष्टीकरण...

राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यास असमर्थता दर्शवली आहे. ही योजना आता लागू केली तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही, परंतु त्याचे विपरित परिणाम हे २०३० नंतर पाहायला मिळतील, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं होतं. त्यानंतर कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत कर्मचारी संघटनांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारशी चर्चा केली होती.

IPL_Entry_Point