बॉलीवूड अभिनेता गोंविदा आहूजा याने पुन्हा एकदा राजकारणात प्रवेश केला आहे. जवळपास १४ वर्षानंतर गोविंदाने राजकारणात पाय ठेवला आहे. आज गोविंदाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. गोविंदा उत्तर पश्चिम मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. २००४ मध्ये गोविंदाने मुंबई उत्तर मतदारसंघातून पाच वेळचे भाजप खासदार राम नाईक यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. त्यानंतर राम नाईक यांनी माझा पराभव करण्यासाठी गोविंदाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची मदत घेतल्याचा खळबळजनक दावा केला होता. राम नाईक यांनी २०१६ मध्ये उत्तरप्रदेशचे राज्यपाल असताना हा आरोप केला होता. त्यांचे वक्तव्य आता पुन्हा व्हायरल झाले आहे.
राम नाईक यांनी आपले आत्मचरित्र ‘चरैवेती चरैवेती' मधून हा खळबळजनक दावा केला होता. या आत्मचरित्रात त्यांनी आपल्या ६० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीचा लेखाजोखा मांडला आहे. त्यात म्हटले आहे की, गोविंदा व दाउदचे संबंध आहेत. त्यांनी मतदारांनी धमकावून मते मिळवली आहेत. त्याचबरोबर त्यांनी टीव्ही चॅनेल्सवरही आरोप केला होता की, मतदारांना प्रभावित करण्यासाठी त्यांनी केवळ गोविंदाचे चित्रपट त्याकाळात दाखवले होते.
दरम्यान राम शिंदेंच्या या वक्तव्याची आठवण करून देत शिवसेना ठाकरे गटाने ट्विट करत एकनाथ शिंदेंना सवाल केला आहे की, भाजपला विचारूनच गोविंदाचा पक्षप्रवेश केलाय ना?
२००४ मध्ये काँग्रेसने उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवलेला गोविंदा जायंट किलर ठरला होता. पाच वेळा लोकसभेचे मैदान मारणारे राम नाईक यांच्यासाठी ही निवडणूक सोपी वाटत होती. त्यांच्या विजय निश्चित मानला जात होता. मात्र पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या गोविंदाने येथे धक्कादायकरित्या विजय मिळवला होता. उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे वर्चस्व होते. येथून राम नाईक यांनी १९८९, १९९१, १९९६, १९९८ व १९९९ च्या लोकसभेत सलग पाच विजय मिळवले होते. या या मतदारसंघात विरारचा समावेश होता. मात्र २००९ मध्ये मतदारसंघ पुर्नरचना झाल्यानंतर विरार पालघरला जोडण्यात आले.