Govind Pansare : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सर्व ६ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Govind Pansare : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सर्व ६ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Govind Pansare : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सर्व ६ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Updated Jan 29, 2025 05:12 PM IST

Govind Pansare Murder Case : पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींना२०१८ साली अटक झाली होती, तेव्हापासून ते कारागृहात आहेत.त्यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता, जो न्यायालयाने मंजूर केला आहे.

कॉम्रेड गोविंद पानसरे (संग्रहित छायाचित्र)
कॉम्रेड गोविंद पानसरे (संग्रहित छायाचित्र)

Comrade Govind Pansare Murder Case :कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील सर्व आरोपी जामीनावर बाहेर आले आहेत. हत्या प्रकरणातील सर्व ६ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती ए. एस. किल्लोर यांच्या एकलपीठाकडून हा निर्णय देण्यात आलाय. गोविंद पानसरे यांची २०१५ मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.

सचिन अंदुरे, गणेश मिस्किन, अमित देगवेकर, अमित बट्टी, भरत कुराणे आणि वासुदेव सूर्यवंशी या आरोपींनी जामीनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. २०१८ आणि २०१९ मध्ये आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून ते कारागृहात आहेत. आता त्यांना जामीन मंजूर झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

गोविंद पानसरेहत्येनंतर ३ ते ४ वर्षानंतर आरोपींना अटक करण्यात आली होती. २०१८-१९ पासून आरोपी कारागृहात होते. पानसरे हत्या खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नसल्याने आरोपींना जामीन मंजूर केल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. त्याचबरोबर या प्रकरणातील तपासात लक्षणीय प्रगती न झाल्याने आरोपी जामीनासाठी पात्र असल्याचा निर्वाळा मुंबई हायकार्टाने दिला आहे.

१६ फेब्रुवारी २०१५ रोजी कॉ. गोविंद पानसरे यांची कोल्हापुरातील त्यांच्या राहत्या घराजवळ ते मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यांना एअर एम्ब्युलन्सने मुंबईला हलवण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. पानसरे यांच्या हत्येचा संबंध नरेंद्र दाभोळकर आणि गौरी लंकेश यांच्या हत्येशी होता. गौरी लंकेश हत्या प्रकरणात आरोपींना अटक झाल्यानंतर गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासाला गती आली होती.

आरोपींना २०१८ साली अटक झाली होती, तेव्हापासून ते कारागृहात आहेत. त्यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता, जो न्यायालयाने मंजूर केला आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर मेघा पानसरे यांनी म्हटले की, उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जायचं का नाही, हे आम्ही आमच्या वकीलाशी चर्चा करून ठरवू. या प्रकरणातील प्रमुख आरोपी अजूनही फरार आहेत. आरोपींना पकडण्यात तपास यंत्रणांना अपयश आलं आहे. जिल्हा सत्र न्यायालयात गेल्या सहा वर्षापासून हा खटला सुरू आहे. प्रदीर्घ काळ चाललेला खटला नियमित सुनावणी घेऊन संपवावा, अशी आमची मागणी असल्याचे पानसरे म्हणाल्या.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर