- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त व महाराष्ट्राचे पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. सर्व आमदारांना (शिंदे गटातील) सुरक्षा द्यावी, असे पत्रात म्हटले आहे.
मुंबई – शिवसेनेतील बंडाळीमुळे राज्यातील राजकारण अस्थिर झाले आहे. शिवसेना व बंडखोर समर्थक एकमेकांना भिडत आहेत. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गदारोळात बंडखोर आमदारांनी आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. याप्रकरणी आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. सर्व आमदारांना (शिंदे गटातील) सुरक्षा द्यावी, असे पत्रात म्हटले आहे. याशिवाय आमदारांच्या सुरक्षेसाठी केंद्राने वाय प्लस सुरक्षा यंत्रणा पुरवण्यात आली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रात शिवसैनिक आक्रमक झाले असून अनेक कार्यकर्ते हे आता रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत. यामध्येच सेनेच्या अनेक बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात आली आहे. त्याचबरोबर शिंदे यांच्यासह अनेक आमदारांच्या पोस्टरवर काळे फासण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक संतप्त झाले असून आमदारांच्या कार्यालयांवर व निवासस्थानांना लक्ष्य केले जात आहे. यानंतर बंडखोर आमदारांनी महाराष्ट्र सरकारकडे स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेची मागणी केली होती.
याप्रकरणी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी पत्र लिहिण्यापूर्वी केंद्र सरकारनेही मोठा निर्णय घेतला होता. शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवली जाणार आहे. आज सायंकाळपर्यंत सर्व आमदारांच्या घरी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत. या आमदारांना Y+ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.