मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'मुस्लिम समाजाच्या सामाजिक-आर्थिक सबळीकरणात 'अंजुमन'चे योगदान मोठे': राज्यपाल रमेश बैस

'मुस्लिम समाजाच्या सामाजिक-आर्थिक सबळीकरणात 'अंजुमन'चे योगदान मोठे': राज्यपाल रमेश बैस

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Feb 20, 2024 04:48 PM IST

मुंबईतील 'अंजुमन-ए-इस्लाम' या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. जहीर काजी यांना भारत सरकारकडून नुकताच ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार 'अंजुमन ए इस्लाम' या संस्थेच्या कार्याचा गौरव असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

Governor Ramesh Bais felicitates Dr Zahir Kazi
Governor Ramesh Bais felicitates Dr Zahir Kazi

मुंबई शहरातील प्रसिद्ध ‘अंजुमन-ए-इस्लाम’ ही राष्ट्रप्रेमी शिक्षण संस्था असून आपल्या १५० वर्षांच्या कार्यकाळात या शिक्षण संस्थेने देशाच्या आणि विशेषतः मुस्लिम समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक सबळीकरणात मोठे योगदान दिले असल्याचे मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले. या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. जहीर काजी यांना भारत सरकारकडून नुकताच ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार 'अंजुमन ए इस्लाम' या संस्थेच्या कार्याचा गौरव असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. भायखळा येथील साबू सिद्दीक पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या प्रांगणात डॉ. काजी यांचा नुकताच जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी सत्कार सोहळ्याला 'अंजुमन' संस्थेचे उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले, डॉ शेख अब्दुल्ला, कोषाध्यक्ष मोईज मियाजीवाला, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती अमजद सैयद व आमदार अबू आझमी उपस्थित होते.

‘अंजुमन’ शिक्षण संस्थेने स्थापनेपासून कौशल्य शिक्षण व प्रशिक्षण तसेच महिलांच्या शिक्षणाला महत्व दिल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी युवा वर्गाला शिक्षित तसेच कौशल्य प्रशिक्षित करणे आवश्यक असल्याचे सांगून 'अंजुमन' संस्थेने युवकांना कौशल्यासोबतच उद्यमशील होण्यास प्रोत्साहित करावे असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आजच्या युगात शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना या तंत्रज्ञानाचे लाभ आणि तोटे याबद्दल शिकवले पाहिजे, असंही राज्यपाल म्हणाले.

आपल्याला जाहीर झालेला ‘पद्मश्री पुरस्कार’ हा 'अंजुमन' शिक्षण संस्थेच्या १ लाख १० हजार विद्यार्थ्यांचा तसेच ३,५०० शिक्षक व कर्मचाऱ्यांचा आहे असे सांगून 'अंजुमन' शिक्षण संस्थेने चित्रपट, क्रीडा, विज्ञान यांसह अनेक क्षेत्रात देशाला नामवंत विद्यार्थी दिले असे डॉ. जहीर काजी यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

अभिनेते दिलीप कुमार, कादर खान, क्रिकेटपटू गुलाम परकार, सलीम दुराणी, यशस्वी जयस्वाल, सरफराज हे अंजुमन-ए-इस्लाम शिक्षण संस्थेचे विद्यार्थी असल्याचे डॉ. काजी म्हणाले. ‘अंजुमन’चे ५० टक्के विद्यार्थी फी देऊ शकत नाहीत तर ६० टक्के विद्यार्थी हे पहिल्या पिढीतले शिक्षण घेणारे असतात अशी माहिती डॉ. काजी यांनी दिली. अंजुमन संस्थेने एमआयटी, बोस्टन व वेस्टमिन्स्टर विद्यापीठ लंडन यांचेशी शिक्षण सहकार्य करार केल्याचे त्यांनी सांगितले.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग