मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Koshyari: मोदींचं गुणगान करताना कोश्यारी भलतंच काही बोलून गेले; विरोधक भडकले!

Koshyari: मोदींचं गुणगान करताना कोश्यारी भलतंच काही बोलून गेले; विरोधक भडकले!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 06, 2022 03:21 PM IST

Bhagat Singh Koshyari : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले आणि मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

Governor BS Koshyari Controversial Statement
Governor BS Koshyari Controversial Statement (HT_PRINT)

Governor BS Koshyari Controversial Statement : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे गेल्या दोन वर्षांपासून सतत कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त वक्तव्यामुळं चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अंधेरीतील एका कार्यक्रमात बोलताना 'गुजराती आणि राजस्थानी लोकांनी मुंबई सोडली तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नसल्याचं' वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि सत्ताधारी शिंदे गटासह भाजपनंही टीका केली होती. त्यानंतर त्यांना एक पत्रक जारी करून माफी मागावी लागली होती. परंतु आता त्यांनी अजून एक वादग्रस्त विधान केलं आहे ज्यामुळं पुन्हा राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

नागपूरातील एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत वेगानं पुढं जात असून मोदी दिवसातून तब्बल २० तास काम करतात, त्यामुळं भारताची जगभरात किर्ती वाढत असून जो मान मोदी यांच्या आधी भारताला आणि भारतीयांना मिळाला नव्हता तो आता मिळत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यामुळं त्यांच्या या वक्तव्याचा राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विरोध केला असून त्यावरून आता राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शतक महोत्सवाच्या कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी बोलत होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कोश्यारींवर जोरदार टीका केली आहे.

विरोधकांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार....

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधी भारताचा जगात मान नव्हता का?, देशाच्या याआधीच्या पंतप्रधानांनी काहीही केलेलं नाही का?, असे प्रश्न करत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

रोहित पवार म्हणाले की, आज कळस दिसत असेल तर त्याचा भक्कम पाया हा आधीच घातला गेलेला आहे आणि त्यात आजपर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांचा वाटा आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. तसंच देश उभारणीत केवळ विशिष्ट नेत्याचंच योगदान असतं असं नाही तर आपली संस्कृती आणि सर्वच भारतीय नागरीकांचे योगदान तेवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून 'आधी भारतीयांना किंमत नव्हती' असं वक्तव्य घटनात्मक पदावरील व्यक्तीने करणं ही अत्यंत निंदनीय बाब असल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या