मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bhagat Singh Koshyari: कोश्यारींना दिल्लीतून बोलावणे; महाराष्ट्रातून उचलबांगडी होणार?
Bhagat Singh Koshyari In Delhi
Bhagat Singh Koshyari In Delhi (HT)

Bhagat Singh Koshyari: कोश्यारींना दिल्लीतून बोलावणे; महाराष्ट्रातून उचलबांगडी होणार?

24 November 2022, 12:16 ISTAtik Sikandar Shaikh

Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता ते पहिल्यांदाच दिल्लीत दाखल झाले आहेत.

Bhagat Singh Koshyari In Delhi : औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दीक्षांत समारोह सोहळ्यात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी करत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता अखेर भाजपच्या शीर्ष नेत्यांनी राज्यपाल कोश्यारी यांना दिल्लीत बोलावलं असून त्यानंतर आत ते दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळं आता सततच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वरिष्ठांकडून नारळ देण्यात येणार असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असून आताचे आदर्श हे नितीन गडकरी असल्याचं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं होतं. याशिवाय समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?, असंही वादग्रस्त वक्तव्य कोश्यारींनी केलं होतं. त्याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्याबाबतही कोश्यारींनी अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नसल्याचंही वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल कोश्यारींनी केलं होतं. त्यामुळं आता केंद्रातील मोदी सरकार राज्यपालांबाबत काय निर्णय घेणार, याकडे राज्याचं लक्ष आहे.

महाराष्ट्रातील राज्यपाल बदलणार?

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. त्यामुळं शिंदे-फडणवीस सरकारची मोठी राजकीय अडचण होत आहे. कोश्यारींच्या वक्तव्यामुळं फडणवीस-शेलार यांच्यातील सुप्त संघर्षही चव्हाट्यावर आला. त्यामुळं आता दिल्लीतील नेते राज्यपाल कोश्यारींची बदली करणार की त्यांची कानउघाडणी करून पुन्हा महाराष्ट्रात पाठवणार, याविषयी सर्वत्र चर्चा सुरू आहे.