राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारतर्फे विविध योजनांची आखणी करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून कोल्हापूरच्या दसरा मेळावामध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दहा दिवस थाटात साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कोल्हापूरच्या दसरा मेळाव्यात दरवर्षी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि राजघराण्यातील मान्यवरांच्या हस्ते सीमोल्लंघन सोहळा आणि सोनं लुटण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यासाठी ऐतिहासिक दसरा मैदानात हजारो नागरिक गर्दी करत असतात. आता हा सोहळा दहा दिवस साजरा करण्यासाठी सरकारतर्फे निधी दिला जाणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.
कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव किमान दहा दिवस चालल्यास जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास साधला जाईल, असं अजित पवार म्हणाले. या महोत्सवाला पर्यटन विभागाने सहकार्य करण्याच्या सूचना अजित पवार यांनी दूरध्वनीद्वारे विभागाच्या सचिवांना दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री पवार हे सध्या कोल्हापूर शहराच्या दौऱ्यावर असून त्यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.के.मंजूलक्ष्मी उपस्थित होते. कोल्हापूर शहरात ऐतिहासिक शाहू मिल परिसरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार असून बिंदू चौकातील कारागृहाचे दुसरीकडे स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. कोल्हापूर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, सर्व सोयींनीयुक्त शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज इमारत, विभागीय क्रीडा संकुल, शेंडा पार्क येथील प्रशासकीय इमारत, रंकाळा सुशोभीकरण यासह जिल्ह्यातील विविध विकासकामे गतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देवू, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. श्रीक्षेत्र अंबाबाई व श्री ज्योतिबा मंदिर विकास आराखडा प्रमाणेच रंकाळ्याचा विकास आराखडा तयार करा. शासनाकडून यासाठी आवश्यक असणारा निधी देण्यात येईल असं सांगून रंकाळा तलावाच्या तटबंदीची दुरुस्ती, झाडांना पार बांधून घेणे, सार्वजनिक ठिकाणच्या वास्तुंची डागडुजी करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले.
दूधगंगा गळती प्रतिबंधात्मक कामाची व घटप्रभा मध्यम प्रकल्पाची निविदा देवून पुढील कार्यवाही गतीने करा, असं पवार म्हणाले. धामणी प्रकल्पातील गावांना सानुग्रह अनुदानासाठीच्या प्रस्तावाला शासन स्तरावरुन मान्यता देण्यात येईल. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरनियंत्रणासाठीच्या आराखड्यास केंद्रशासनाकडून मान्यता दिली असून वर्ल्ड बँकेसमवेत सामंजस्य करार करण्याची कार्यवाही होईल असेही अजित पवार म्हणाले.