मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut Viral Audio Clip: संजय राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ, कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची होणार चौकशी

Sanjay Raut Viral Audio Clip: संजय राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ, कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची होणार चौकशी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 27, 2022 01:33 PM IST

MP Sanjay Raut Audio Clip : काही दिवसांपासून शिवसेना नेते संजय राऊत यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात संजय राऊत एका महिलेला शिवीगाळ करत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Sanjay Raut Viral Audio Clip
Sanjay Raut Viral Audio Clip (HT_PRINT)

Sanjay Raut Viral Audio Clip : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या संजय राऊतांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहे. कारण आता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून या प्रकरणात पीडित महिला स्वप्ना पाटकर यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.

काही दिवसांपासून संजय राऊत यांचा आवाज असलेली एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यात संजय राऊत हे पीडित महिला स्वप्ना पाटकर या महिलेला शिवीगाळ करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या कथित ऑडिओ क्लिपची पुष्टी करण्यात आलेली नसल्यानं आता या प्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी वाकोला पोलिसांनी पीडित महिलेला बोलावलं आहे. त्यामुळं आता संजय राऊतांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

प्रकरणाची गंभीरतेनं दखल घेण्याचे शिंदे सरकारचे आदेश...

संजय राऊतांच्या आवाजात व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिप प्रकरणाची शिंदे सरकारनं दखल घेतली असून पोलीस विभागानं या प्रकरणात गंभीर दखल घेण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर आता वाकोला पोलिसांनी पीडित महिलेला जबाबासाठी बोलावलं आहे. ७० सेकंदाच्या या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत आणि स्वप्ना पाटकर यांचा संवाद असल्याचा दावा करण्यात येत आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर या कथित ऑडिओ क्लिपची जोरात चर्चा सुरू आहे.

व्हायरल ऑडिओ क्लिपमधील आवाज राऊतांचाच- भाजप

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज हा शिवसेना नेते संजय राऊतांचाच असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याशिवाय या प्रकरणाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेऊन त्याची चौकशी करण्याचीही मागणी सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर आता या प्रकरणात संजय राऊतांविरोधात कलम ५०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp channel