राज्यातील बेरोजगार तरुणासांठी खुशखबर आहे. पोलीस भरती, वनभरती व तलाठी भरती प्रक्रियेची जाहिरात निघाल्यानंतर व ही भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता सरकारकडून आरोग्य विभागातील ११ हजार पदांच्या बंपर भरतीची घोषणा करण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे सर्व नोकर भरती प्रक्रिया ठप्प होती. आता कोरोनानातून सावरल्यानंतर वेगवेगळ्या विभागांसाठी सरकारी नोकरभरती जाहीर होत आहे.
राज्य सरकारकडून काही दिवसांपूर्वी पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती. नंतर वन विभागाकडून वन संरक्षक आणि मसहूल विभागाकडून तलाठी भरतीची घोषणा करण्यात आली होती. राज्यात सध्या तलाठी पदाच्या ४,६४४ जागांसाठी परीक्षा सुरू आहे. त्यानंतर आता आरोग्य विभागाकडून नोकरभरतीची घोषणा करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी ही घोषणा केली आहे.
मंत्री तानाजी सावंत यांनी घोषणा केली आहे की, राज्यात उद्यापासून (२९ ऑगस्ट) आरोग्य विभागात भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. आरोग्य विभागातील रिक्त असलेल्या ११ हजार पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असल्याने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येत आहे. याबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. आरोग्य विभागाने या प्रकरणी महत्त्वाचं पाऊल उचललं असून तब्बल ११ हजार पदांची घोषणा केली आहे.
आरोग्य विभागातील ११ हजार पदांसाठी उद्या (मंगळवारी) सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आरोग्य विभागात वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीत अधिकाऱ्यांची तसेच कर्मचाऱ्यांची देखील निवड केली जाणार आहे.