मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  केंद्राच्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’वर गावकऱ्यांकडून दगडफेक; सरकारी कर्मचारी धास्तावले

केंद्राच्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’वर गावकऱ्यांकडून दगडफेक; सरकारी कर्मचारी धास्तावले

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Dec 31, 2023 03:15 PM IST

राज्यात ग्रामीण भागात विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गेल्यानंतर वाद निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. काही गावांमध्ये तर सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ग्रामस्थांकडून शिव्या ऐकाव्या लागत आहेत. काही गावांमध्ये भारत संकल्प यात्रेच्या रथावर लोकांकडून दगडफेकीचे प्रकार झाले आहेत.

केंद्राच्या योजनांची माहिती देणारा विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गावागावांमध्ये जात आहे.
केंद्राच्या योजनांची माहिती देणारा विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गावागावांमध्ये जात आहे.

केंद्रातील मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी सरकारी कर्मचारी गावाखेड्यातून ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चा चित्ररथ घेऊन फिरत आहेत. परंतु बऱ्याच गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गेल्यानंतर वाद निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. काही गावांमध्ये तर सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ग्रामस्थांकडून शिव्या ऐकाव्या लागत आहेत. काही गावांमध्ये भारत संकल्प यात्रेच्या रथावर लोकांकडून दगडफेकीचे प्रकार झाले आहेत. परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परभणी जिल्ह्यातील काही कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या यात्रेत सामील होण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

संकल्प यात्रा रथावर ‘मोदी सरकार’ असा उल्लेख; कर्मचारी अडचणीत

संकल्प यात्रा रथावर ‘मोदी सरकार’ असा उल्लेख करण्यात आला आहे. अनेक गावांमध्ये नागरिक याबद्दल यात्रेत सामील सरकारी कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारत असल्याची तक्रार या कर्मचाऱ्यांनी पत्रात केली आहे. तुम्ही भारत सरकारचा प्रचार करण्याऐवजी मोदींचा प्रचार का करत आहात, असा प्रश्न गावकरी विचारत असून त्यांच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देऊ शकत नसल्याचे या कर्मचाऱ्यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

मोदी सरकारच्या खोट्या प्रचारामुळे जनतेमध्ये प्रचंड संताप: कॉंग्रेस

दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारच्या विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गावोगावचे नागरिक हाकलून लावत असून मोदी सरकारच्या खोट्या प्रचारामुळे जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. त्याचाच फटका विकसित भारत रथयात्रेमध्ये जबरदस्तीने सहभागी करून घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना बसत असल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. गावोगावात कर्मचाऱ्यांना लोकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी या विकसित भारत यात्रेच्या रथासोबत फिरण्यास नकार दिला असल्याचे लोंढे म्हणाले.

 

परभणी जिल्हापरिषदेचे ५ कर्मचारी निलंबित

परभणी जिल्हापरिषदेने आदेश काढूनही विकसित भारत संकल्प यात्रेत सामील न झालेल्या सेलू तालुत्यातील पाच कर्मचाऱ्यांना हलगर्जीपणाच्या कारणावरून जिल्हा परिषदेचे सीईओ विनय मून यांनी निलंबित केले आहे. २९ डिसेंबर रोजी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी हा चित्ररथ सेलू तालुक्यातील गव्हा या गावातील ग्रामपंचायतीमध्ये पोहचला. परंतु योजनांची माहिती गावकऱ्यांना देण्यासाठी कुणीही कर्मचारी उपस्थित नव्हतं. त्यामुळे प्रशासनाची अडचण निर्माण झाली होती.

WhatsApp channel