PM Modi on Goregaon Fire incident : मुंबईतील गोरेगावातील आग दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. तर, ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं असून मृत व जखमींच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे.
'मुंबईतील गोरेगाव इथं घडलेली दुर्घटना प्रचंड वेदनादायी आहे. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. हा दुर्दैवी प्रसंग ओढवलेल्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. माझ्या सहवेदना त्यांच्या बरोबर आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो अशी प्रार्थना मी करतो. स्थानिक प्रशासन शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
आग दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातलगांना प्रत्येकी २ लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी माहितीही पंतप्रधानांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यात जीव गमवावा लागलेल्या नागरिकांप्रती मी माझी सहवेदना व्यक्त करतो, असं त्यांनी म्हटलं आहे. 'या आगीच्या घटनेबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून मी वेळोवेळी माहिती घेत असून मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देण्याचे निर्देश दिले आहेत.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या रहिवाशांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसंच जखमी नागरिकांवर सरकारी खर्चानं वैद्यकीय उपचार करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.
आज पहाटे तीनच्या सुमारास ही आग भडकली. रहिवाशी झोपेत असल्यानं त्याना तातडीनं हालचाली करता आल्या नाहीत. आग इतकी भयंकर होती की बघता-बघता तिनं संपूर्ण इमारत कवेत घेतली. यात अनेक गाड्यांचा कोळसा झाला तर ५० हून अधिक रहिवाशी होरपळून गेले. सात जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती आहे. जखमींवर कुपर रुग्णालय, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय व लाइफलाइन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संबंधित बातम्या