मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Gopichand Padalkar Controversial Statement On Ncp Supremo Sharad Pawar Today

गोपीचंद पडळकर पुन्हा बरळले, शरद पवारांवर बोलताना जीभ घसरली, राष्ट्रवादी आक्रमक

Gopichand Padalkar Controversial Statement On Sharad Pawar
Gopichand Padalkar Controversial Statement On Sharad Pawar (HT)
Atik Sikandar Shaikh • HT Marathi
Mar 27, 2023 01:26 PM IST

Gopichand Padalkar Live : चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत झालेल्या सभेत बोलताना आमदार गोपीचंद पडळकरांनी पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Gopichand Padalkar Controversial Statement On Sharad Pawar : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच वादात सापडणारे आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापुरमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी 'शरद पवार ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, ही कीड मुळापासून काढून टाकावी लागेल', असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते. त्यामुळं आता आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नव्या वक्तव्यामुळं राजकीय वादंग पेटलं असून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहे.

ट्रेंडिंग न्यूज

इंदापुरमधील भाजपच्या कार्यक्रमात बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रासह देशात अनेक वर्षे यांच्याकडेच सत्ता होती. परंतु त्यांनी राज्यातील दुष्काळी भागात कधीही पाणी पोहचवण्याचं काम केलं नाही. शरद पवार कृषिमंत्री असताना त्यांना राज्यात पैसा आणावासा वाटला नाही. त्यामुळं शरद पवार ही महाराष्ट्राला लागलेली कीड असून ती काढून टाकायला हवी, असं वादग्रस्त वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.

महाराष्ट्राचे तीन राज्य करावे लागतील- पडळकर

शरद पवार यांना पंतप्रधान करायचं असेल तर महाराष्ट्राचे तीन राज्य करावे लागतील. लवासा, बारामती आणि मगरपट्टा. लवासाच्या मुख्यमंत्री सुप्रिया सुळे, मगरपट्ट्याचे जयंत पाटील आणि बारामतीचे मुख्यमंत्री अजित पवार यांना करावं लागेल. हे तिन्ही राज्य मिळून एक देश तयार केला तर शरद पवार हे पंतप्रधान होऊ शकतात, असंही गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीची पडळकरांवर टीका...

गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'हा गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखा आहे. पवारांचं नुसतं नाव जरी ऐकलं की गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणुन समजा. याला जास्त दिवस संन्यासी ठेवणं त्याच्या पक्षाला परवडणार नाही, हा त्याच्या पक्षाला एकदिवस आग लावून त्याच भट्टीवर बुड शेकत आनंद घेईल, असं म्हणत मिटकरींनी पडळकरांना टोला हाणला आहे.

WhatsApp channel