केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुणेकरांना खुशखबर दिली. पुणे-दुबई-पुणे आणि पुणे-बँकॉक-पुणे विमानसेवा येत्या २७ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची घोषणा केली मोहोळ यांनी केली. मोहोळ यांनी X या सोशल मीडियावर ही घोषणा केली. ‘येत्या २७ ऑक्टोबर २०२४ पासून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुणे-दुबई-पुणे (दैनिक विमानसेवा) आणि पुणे-बँकॉक-पुणे (आठवड्यातून तीन वेळा) सुरू होणार असल्याचे जाहीर करताना आनंद होत आहे. पुणेकर आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करण्यासाठी या विमानसेवांचा फायदा होईल..हॅपी फ्लाइंग!’ असं मोहोळ यांनी सोशल मीडियावर लिहिलं.
पुणे विमानतळावरून एका दिवसात दररोज सुमारे ३० हजार प्रवासी ये-जा करत असतात. आता या दोन आंतरराष्ट्रीय शहरांना जोडणारी नवीन विमानसेवा सुरू झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुणे शहराचे वाढते औद्योगिक महत्व अधोरेखित झाले आहे. शिवाय पुणे आणि परिसरातील व्यावसायीक आणि नागरिकांना दुबई आणि बँकॉकसारख्या शहरांना प्रवास करण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध झाले आहे.
पुणे-दुबई-पुणे दरम्यान एप्रिल महिन्यात स्पाइस जेट कंपनीने विमानसेवा सुरू केली होती. परंतु ही सेवा नंतर खंडित करण्यात आली होती. त्यानंतर दुबई आणि बँकॉकला भेट देणारे नागरिक मुंबईमार्गे जात होते.
दरम्यान, पुणे विमानतळावर रविवारी पहिल्यांदाच २०० विमानांचे आगमन-उड्डाणे झाल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली. यामध्ये १०० विमानांचे आगमन झाले तर १०० विमानांनी पुणे विमानतळावरून येथून उड्डाण केले आहे. पूर्वी ही संख्या दररोज १८५ ते १९० विमाने एवढी असायची.
केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्रालयाद्वारे नांदेड, सिंधुदुर्ग, भोपाळ, जबलपूर इत्यादी जिल्ह्याच्या ठिकाणी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. राज्यात आणखी काही ठिकाणी विमानसेवा सुरू करण्याची योजना आहे.