Shivshahi Bus Accident News: गोंदियात (Gondia) शिवशाही बसला भीषण अपघात झाला. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मृतांच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत जाहीर केली. समोर आलेल्या दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले.
गोंदिया-कोहमारा राज्य महामार्गावरील खजरी गावाजवळ शुक्रवारी १२.३० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. ही बस भंडारा येथून साकोली लाखनी मार्गे गोंदियाकडे जात होती. वळण घेत असताना अचानक समोरून एक दुचाकी आल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात आले. या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. अनेकांची प्रकती चिंताजनक असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
अपघाताच्या वेळी बसमध्ये ३५ हून अधिक प्रवासी होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर बस चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना गोंदिया जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघात झालेल्या बसला उचलण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
संबंधित बातम्या