महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची (mazi ladki bahin yojana) सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेसाठी नोंदणी करताना महिला व नागरिकांना आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी प्रचंड धावाधाव करावी लागत आहे. लाडकी योजनेंतर्गत पात्र महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये मिळणार आहे. मात्र यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दमछाक होत आहे. त्यातच या योजनेसाठी कागदपत्रे जमवताना अपघात होऊन एका ४३ वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.
शिवलाल लाडे (वय ४३) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पत्नीला योजनेचे लाभ मिळवून देण्यासाठी शिवलाल कागदपत्रे काढण्यासाठी पळापळ करत होते. त्यावेळी दुचाकीचा झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. घटना आज ( ३ जुलै) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मोरगाव टि-पॉइंट येथील हिमालय बारजवळ घडली.
मृत शिवलाल लाडे त्यांच्या पत्नीला निलज या गावातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची कागदपत्रे घेण्यासाठी तहसील कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे घेऊन गेले होते. मात्र, शिवलाल यांचेकडून घरी एक कागदपत्र विसरल्याने ते राहिलेले कागदपत्र घेऊन अर्जुनी मोरगावकडे परत जात असताना अपघाताची भीषण घटना घडली. मोरगाव टि-पॉइंट येथे हिमालय बार समोर एका ट्रकने शिवलाल यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये, दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मोरगाव अर्जुनी पोलिसांत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
राज्य सरकारने या योजनेसाठी ४६ हजार कोटींच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. महिन्याला दीड हजार रुपये देणाऱ्या या योजनेचे महिला वर्गातून स्वागत करण्यात येत आहे. दुसरीसाठी महिलांना कागदपत्रे जमवण्यासाठी पळापळ करावी लागत आहे. महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी घरातील पुरुषही महसूल विभागात खेटे मारत आहेत.
गोंदिया जिल्ह्यात याच धावपळीत एकाला जीव गमवावा लागला आहे. गावातून तालुक्याच्या ठिकाणी जाताना झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
राज्यभरात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची चर्चा सुरू आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रांकरिता ग्रामीण भागातील नागरिक तालुकास्तरावर येत आहेत.
संबंधित बातम्या