मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Express : महाराष्ट्र एक्सप्रेस अचानक तीन दिवसांसाठी रद्द; काय आहे कारण?

Maharashtra Express : महाराष्ट्र एक्सप्रेस अचानक तीन दिवसांसाठी रद्द; काय आहे कारण?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 18, 2023 04:33 PM IST

Maharashtra Express Canceled : महाराष्ट्र एक्सप्रेस अचानक रद्द करण्यात आल्यामुळं प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

Maharashtra Express Canceled
Maharashtra Express Canceled (HT)

Maharashtra Express Canceled : उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी राज्यातील अनेक प्रवासी फिरण्यासाठी बाहेर पडत असतानाच आता विदर्भातील महाराष्ट्र एक्सप्रेस तीन दिवसांसाठी अचानक रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे लाईन आणि यार्ड रिमॉडेलिंगच्या दुरुस्तीच्या कामामुळं रेल्वेनं महाराष्ट्र एक्सप्रेसच्या फेऱ्या २१ ते २३ मार्च दरम्यान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं गोंदिया ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते गोंदिया या दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत होणार आहे. त्यामुळं आता रेल्वेच्या या निर्णयाचा प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.

सोलापूर विभागातील मनमाड, दौंड, बेलापूर, चितळी आणि पुणतांबा येथे दुहेरी रेल्वे लाईनच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळं अनेक रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून महाराष्ट्र एक्सप्रेस तीन दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहे. कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस, पुणे-हटिया एक्स्प्रेस आणि पुणे-हावडा या एक्स्प्रेस देखील रद्द करण्यात आल्या आहेत. तीन दिवसांनंतर रेल्वे लाईनचं काम संपल्यानंतर सर्व गाड्या नियोजित वेळापत्रकानं सुरू करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय रेल्वेनं दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच रेल्वे लाईनच्या दुरुस्तीसाठी मुंबई-पुणे मार्गावरील सर्व रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता गोंदिया-नागपूर दरम्यान धावणारी महाराष्ट्र एक्सप्रेसही रद्द करण्यात आल्यामुळं प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. २४ मार्चनंतर या सर्व रेल्वेगाड्या नियोजित वेळेनुसार सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

WhatsApp channel