Heated argument between teacher and principal : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशी म्हण तुम्ही ऐकली असेल, मात्र दोघांच्या भांडणात जीव गमवावा लागण्याची घटना तशी दुर्मिळच म्हणावी लागेल. दोघांमधील वाद सोडवणे किती धोकादायक असू शकते याचा प्रत्यय गोंदिया जिल्ह्यात आला आहे. गोंदियातील देवरी तालुक्यात असलेल्या सिद्धार्थ विद्यालय तथा महाविद्यालय डवकी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.
शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकाच्या भांडणात सेवानिवृत्त लिपिकाचा जीव गेला आहे. मृत लिपीक संस्थेचे उपाध्यक्षही होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सिद्धार्थ विद्यालय डवकी येथे मुख्याध्यापक आणि एका शिक्षकाचा वाद झाला. प्रकरण हातघाईवर आल्यानंतर मध्यस्थी करायला गेलेल्या सेवानिवृत्त लिपिकाला हकनाक आपला जीव गमवावा लागला आहे.
हत्या झालेल्या सेवानिवृत्त लिपिकाचं नाव मुकुंद बागडे (वय ६० वर्षे) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ विद्यालयाच्या संस्थेची बुधवारी सभा आयोजित केली होती. संस्थेची सभा संपताच शाळेतील शिक्षक आरोपी हिरालाल खोब्रागडे (वय ५२ वर्षे) यांनी अचानक येऊन शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र मेश्राम यांच्याशी वाद घालायला सुरूवात केली. तुम्ही माझे आयुष्य बरबाद केले असं म्हणत शिक्षण मुख्याध्यापकांशी वाद घालत होते.
वाद वाढत चालल्याचे पाहून बागडे मध्यस्थी करण्यासाठी गेले. मात्र आरोपी शिक्षक रागाने फणफणत होता. तो लाकडी दांड्याने मुख्याध्यापकाला मारण्याचा प्रयत्न करत असताना सेवानिवृत्त लिपिक बागडे यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने बागडे यांनाच मारहाण करत लाकडी दांडका त्यांच्या डोक्यावर मारला. यात गंभीर दुखापत झाल्याने बागडे जागीच बेशुद्ध होऊन कोसळले.
त्यांना रक्कबंबाळ अवस्थेत गोंदियातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले गेले, तेथे उपचारादरम्यान त्यांचा आज सकाळी मृत्यू झाला. या घटनेची नोंद देवरी पोलीस ठाण्यात केली असून आरोपी शिक्षकाविरोधात भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
संबंधित बातम्या