पुण्यातील कल्याणीनगर विमानतळ रोडवर अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत अलिशान पोर्शे कारने दोन जणांना उडवले होते. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत तरुण जोडप्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांनाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान ही घटना ताजी असताना अशाच प्रकारची आणखी एक घटना समोर आली आहे. गोंदियामध्ये मद्यधुंद चालकाने एका महिलेला ट्रॅक्टरखाली चिरडले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून दोन मुली थोडक्यात बचावल्या.
ही घटना गोंदिया जिल्हयातील आमगाव नगर परिषदेच्या अंतर्गत येत असलेल्या किडांगीपार येथे घडली. किसनाबाई बुधराम चोरवाडे (वय ५८ वर्ष) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर संदीप कोरे असे ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. महिला रस्त्याकडेला आपल्या घरासमोर कपडे धुत असताना अचानक समोरून संदीप कोरे हा ट्रॅक्टर चालवत आपल्या शेतातून धान घेऊन येत होता. तो मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालवत होता.
दरम्यान त्याचं ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटलं आणि ट्रॅक्टर घरात शिरला. यामुळे ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने किसनाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांच्या दोन नाती जवळच होत्या, या अपघातातून त्या थोडक्यात बचावल्या. ट्रॅक्टर चालकाच्या चुकीमुळे महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५ जी १६३७ हा आरटीओ द्वारे पासिंग केलेला नव्हता. ट्रॉलीही अद्यापही नवीन असून विनानंबर आहे. ट्रॉलीचेही आरटीओ पासिंग केलेले नव्हते. याबाबत आता आमगाव पोलीस पुढील तपास करीत आहे. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पुण्यातील कल्याणीनगर येथे भरधाव पोर्शे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या अश्विनी कोस्टा (Ashwini costa) आणि अनीश अवधिया (anish awadhiya) या तरुण जोडप्यावर तब्बल ५० तासांनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघांचेही मृतदेह सोमवारी रात्री उशिरा त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले. अश्विनी कोस्टा ही तरुणी मध्य प्रदेशातील जबलपूरची तर अनीश अवधिया उमरियाचा रहिवाशी होता. भावपूर्ण वातावरणात दोघांच्या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संबंधित बातम्या