चतुरंगाच्या पन्नाशी निमित्त ११ 'चतुरंग सुवर्णरत्न सन्मानां'ची घोषणा-golden jubilee programme of chaturang sanman ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  चतुरंगाच्या पन्नाशी निमित्त ११ 'चतुरंग सुवर्णरत्न सन्मानां'ची घोषणा

चतुरंगाच्या पन्नाशी निमित्त ११ 'चतुरंग सुवर्णरत्न सन्मानां'ची घोषणा

HT Marathi Desk HT Marathi
Aug 30, 2024 09:52 PM IST

सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत चतुरंग प्रतिष्ठान या संस्थेचे यंदाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून याचा सांगता सोहळा २८ आणि २९ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे.

चतुरंग सुवर्णरत्न सन्मान
चतुरंग सुवर्णरत्न सन्मान

चतुरंग प्रतिष्ठान संस्थेचा सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा मुंबईमध्ये पार पडणार आहे. या सोहळ्याचा केंद्रबिंदू चतुरंग सुवर्णरत्न सन्मान योजना असणार आहे. २८ आणि २९ सप्टेंबर रोजी मुंबईत यशवंत नाट्यमंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कोकणातील ग्रामीण भागातील शाळांसाठी काहीतरी शालोपयोगी उपक्रम करूया अशा छोट्याशा उद्देशाने १९७४ साली चतुरंग प्रतिष्ठान या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेची सुरूवात झाली. संस्थेने विविधांगी असे ६१ उपक्रम अंगीकारत आपल्या वाटचालीची पन्नास वर्षे पूर्ण केली आहे. मुंबई पाठोपाठ डोंबिवली, पुणे, चिपळूण, रत्नागिरी, गोवा.... असा सहा केंद्रांवर आपला पसारा वाढवीत, महाराष्ट्रात सर्वदूर सुमारे २४० हून अधिक स्थळ - ठिकाणांचा वापर करीत ५० वर्षात १८०० हून अधिक कार्यक्रमांचा टप्पा पार केला आहे. 

या कार्यात संस्थेला लोकप्रिय कलावंत, नामवंत, गुणवंत अशी मान्यवरांनी साथ मिळाली आहे. अशा व्यक्तींच्या प्रती जाहीर कृतज्ञता व्यक्त करणारे आनंद सोहळे चतुरंग प्रतिष्ठानने मुंबई खेरीज रत्नागिरी, चिपळूण, गोवा, डोंबिवली, पुणे या अन्य केंद्रांवर साजरे केले आहे. आता सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा मुंबईमध्ये २८ आणि २९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. या सोहळ्याचा केंद्रबिंदू चतुरंग सुवर्णरत्न सन्मान योजना असणार आहे.

चतुरंगचे आत्तापर्यंत एकूण १८०० हून अधिक कार्यक्रम पार पडले. हे कार्यक्रम ज्यांच्या कलावंतपणातून, प्रेरणेने, प्रोत्साहनाने साकार करता आले अशा १४ विद्या ६४ कलांपैकी किमान ११ क्षेत्रांतील नामवंत - गुणवंतांचा जाहीर सन्मान करण्यात येणार आहे. यात पं. उल्हास कशाळकर (गायन), पं. हरिप्रसाद चौरसिया (वादन), अशोक पत्की (संगीत दिग्दर्शन), महेश एलकुंचवार (साहित्य), दिलीप प्रभावळकर (नाटक), रोहिणी हट्टंगडी (चित्रपट), वासुदेव कामत (चित्रकला), चंदू बोर्डे (क्रीडा), डॉ. अनिल काकोडकर (संशोधन) बाबासाहेब कल्याणी (उद्योजकता), मेजर महेश कुमार भुरे ( राष्ट्रीय सुरक्षा) अशी अकरा क्षेत्रातील मान्यवरांची निवड करण्यात आली आहे.

प्रस्तुत निवड करण्यासाठी ११ क्षेत्रातील प्रत्येकी ३-३ मातब्बर - अनुभवी अभ्यासक अशा एकूण ३३ मान्यवर निवड समिती सदस्यांनी काम पाहिलेले असून, त्या सर्वांच्या साक्षीने, त्यांच्याच उपस्थित हा 'चतुरंग सुवर्णरत्न सन्मान सोहळा' शनिवार - रविवार दिनांक २८ – २९ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबईत दादर मध्ये पार पडणार असल्याचे चतुरंग प्रतिष्ठानकडून घोषित करण्यात आले आहे. त्याप्रसंगी होणाऱ्या नाट्य, नृत्य, संगीत, साहित्य, संवाद, गायन, वादन....अशा विविध स्वरूपातील कार्यक्रमांचे तपशील लवकरच घोषित केले जाणार आहे.

विभाग