Amravati Chikhaldara Crime : पुरोगामी राज्याला लाजवेल अशी एक घटना अमरावती जिल्ह्यात उघडकीस आली आहे. ही घटना मेळघाटच्या चिखलदरा परिसरातील रेट्याखेडा गावात घडली आहे. या गावात जादूटोणा केल्याच्या संशयातून एका ७७ वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण करत तिची गावातून धिंड काढण्यात आली.
ग्रामस्थ एवढ्यावरच थांबले नाही तर, तिच्या तोंडाला काळे फसून तिला मूत्र प्यायला लावले. तिला मिरचीची धुरी देण्यात आली. तिच्या गळ्यात बूट व चपलांचा हार घालण्यात येऊन गावातून फिरवले. ही घटना ३० डिसेंबर रोजी घडली असून ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी गावातील काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, जादूटोणा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
काळमी नंदुराम शेलूरकर (वय ७७) असे पीडित महिलेचे नाव आहे. काळमी सेलूकर ही वृद्धा रेट्घाखेडा येथे घरात एकटीच होती. मुलगा राजकुमार व सून शामू हे बाहेरगावी कामावर असतात, तर त्यांची दोन मुले शिक्षणाकरिता वसतिगृहात राहतात. ही महिला ३० डिसेंबर रोजी पहाटे चार वाजता उठून प्रातर्विधीसाठी गेली होती. यावेळी शेजारी राहणाऱ्या सायबू चतुर व त्याच्या पत्नीने या महिलेला पाहताच तिला पकडून ठेवले व पोलिस पाटील बाबू जामूनकर याला बोलावले. आमच्या घराच्या बाजूला जादूटोणा करीत असल्याचा आरोप त्यांनी काळमीवर केला. बाबू जामूनकर याने काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सायबू चतुर, साबूलाल चतुर, रामजी चतुर व इतरही ग्रामस्थांनी लाथाबुक्क्यांनी मरण केली. या महिलेला दोरखंडाने बांधत लोखंडी साखळीचे चटके दिले. एवढेच नाही तर त्यांनी या वृद्ध महिलेला मिरचीची धुरी दिली. तिच्या गळ्यात चप्पल बुटांचा हार घातला. तिला मानवी मूत्र पाजले. तिला मारहाण केली. व तिची धिंड पूर्ण गावातून काढली. हा सर्व प्रकार ग्रामस्त पाहत होते. मात्र, या महिलेच्या मदतीला कोणी आले नाही. गावातील पोलीस पाटील बाबुभाई नावाच्या व्यक्तिने हे क्रूरकर्म केलं. या प्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेने व तिच्या कुटुंबीयांनी ६ जानेवारी रोजी चिखलदरा पोलीस ठाण्यात जात या प्रकरणी तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी फक्त मारहाण करण्याचा गुन्हा दाखल केला. पीडिलेची मुलं राजकुमार शेलुकर व शामू शेलुकर यांनी ही घटना पोलीस अधीक्षकांना भेटून सांगितली. यानंतर पोलिस अधीक्षकांनी या बाबत गंभीर दखल घेतली. पीडित वृद्ध महिला ही मारहाण झाल्यानंतर तिच्या सोनोरी येथे राहत असणाऱ्या मुलीच्या घरी निघून गेली आहे. तिला मोठा धक्का बसला आहे. वृद्ध महिलेच्या शेतात आरोपी पोलिस पाटलाने अतिक्रमण करून अंगणवाडी बांधल्याचा आरोप तिच्या मुलांनी केला आहे.
वृध्द महिलेच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी भारतीय न्याय दंड संहितेनुसार काही गुन्हे दाखल करण्यात केली आहेत. मात्र जादू टोना कायद्यानुसार कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. या प्रकरणाचे संपूर्ण चौकशी केली जाईल व त्यानंतर जादूटोणा संदर्भात गुन्हे लावले जातील अशी माहिती पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली.
संबंधित बातम्या