‘शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अन्यथा १९ मार्चला मुंबईत येऊन आंदोलनाचा बॉम्ब फोडू’
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अन्यथा १९ मार्चला मुंबईत येऊन आंदोलनाचा बॉम्ब फोडू’

‘शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अन्यथा १९ मार्चला मुंबईत येऊन आंदोलनाचा बॉम्ब फोडू’

Published Mar 05, 2025 04:22 PM IST

राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या सहनशिलतेची सत्वपरीक्षा न पाहता निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमाफी करावी. सध्या अधिवेशन सुरू असून१८ मार्चपर्यंत कर्जमाफी न दिल्यास आरपारची लढाई लढणार आहे, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

कर्जमाफी न दिल्यास आंदोलनाचा इशारा
कर्जमाफी न दिल्यास आंदोलनाचा इशारा

 १८ मार्चपर्यंत शेतकरी कर्जमाफीची घोषणा करा अन्यथा १९ मार्च रोजी मुंबई येथे आंदोलनाचा बॉम्ब टाकू असा इशारा विकांत तुपकर यांनी राज्य सरकारला दिला. क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्राची पहिली राज्य कार्यकारणी बैठक पुण्यात पार पडली. यावेळी तुपकर बोलत होते. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल न घेतल्यास सरकार कितीही बलाढ्य बहुमताचे असले तरी त्यांना गुडघे टेकायला लावू असा इशाराही तुपकर यांनी दिला. यावेळी राज्यभरातील शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  राज्यभरातून शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ तसेच तरुण शेकडो शिलेदार बैठकीसाठी पुणे येथे आले होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी संघटनेची रूपरेषा, भूमिका आणि आगामी काळातील उद्देशाबाबत माहिती दिली.  शेतकऱ्यांचा आवाज म्हणून क्रांतिकारी शेतकरी संघटना काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान तुपकर यांनी सत्ताधाऱ्यांच्या एकाधिकारशाही कारभारावर तुफान हल्ला चढवला. उत्पादन खर्च एवढाही भाव नसल्याने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी मरणाच्या दारात येऊन ठेपला आहे असे सांगत राज्यात 60 लाख मेट्रिक टन सोयाबीनचे उत्पादन झालेले असताना सरकारने केवळ १२ ते १५ लाख मॅट्रिक टन एवढ्याच सोयाबीनची खरेदी केली आहे. ती खरेदी करताना उत्पादन खर्च एवढाही भाव दिला नाही. कापूस पिकाची हीच अवस्था आहे. कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी असून दुधाला दर नाही. सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. सत्तेवर येताच त्यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. एवढा विसराळूपणा सत्ताधाऱ्यांना परवडणार नाही, असा इशारा दिला. 

 दरम्यान, राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या सहनशिलतेची सत्वपरीक्षा न पाहता निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमाफी करावी. सध्या अधिवेशन सुरू असून १८ मार्चपर्यंत कर्जमाफी न दिल्यास आरपारची लढाई लढणार आहे. १८ मार्चपर्यंत सरकारला वेळ देत आहोत. या कालावधीपर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी न झाल्यास १९ मार्च रोजी मुंबईत आंदोलनाचा बॉम्ब  फोडू असा गंभीर इशारा यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला. तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी गाड्या भरून १८ मार्च रोजी मुंबईकडे निघून १९ मार्च रोजी मुंबईत धडक देतील असे रविकांत तुपकर म्हणाले. यांनी परंतु त्यांनी कोणते आंदोलन करणार आणि मुंबईत नेमके कुठे करणार याबाबत काहीच सांगितले नाही. यामुळे १९ मार्चला रविकांत तुपकर आणि त्यांची क्रांतिकारी शेतकरी संघटना मुंबईत नेमका कोणता धमाका करते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर