MPSC Paper Leak : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा २ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली आहे. त्यापूर्वी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना फोन कॉल गेले असून तुम्ही आम्हाला ४० लाख रुपये द्या आम्ही तुम्हाला दोन दिवसाआधी पेपर देतो. त्यापूर्वी आपल्याला व्हॉटस्अप कॉलवर मीटिंग करावी लागेल. त्यानंतर ठरल्या प्रमाणे पेपर मिळेल, असे आमिष विद्यार्थ्यांना दाखवल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून सत्य तपासण्याची मागणी केली आहे. तर आयोगाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पुणे पोलिस आयुक्तांकडे याची तक्रार केली आहे.
राज्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. या परीक्षेचा अभ्यास करून सरकारी नोकरी मिळेल या आशेने मुले दिवसरात्र एक करून अभ्यास करत असतात. काही तर अर्धवेळ उपाशी राहून तर काही जण काम करून या परीक्षेची तयारी करतात. मात्र, पुण्यातील घटनेमुळे आता आयोगाच्या परीक्षा प्रणालीवर मुलांनी प्रश्नउपस्थित केले आहे.
नागपूरमधील एका कन्सलटंसीने अनेक मुलांना फोन करून आमिष दाखवले आहे. याचे फोन रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे. काही विद्यार्थ्यांना एका कन्सलटंसीकडून फोन आल्याचे संबंधित विद्यार्थ्यानी सांगितले. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका आदल्या रात्री उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या साठी त्यांनी ४० लाख रुपयांची मागणी केली असल्याचं देखील पुढं आलं आहे. कॉल आलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, तुम्ही ‘गट ब’च्या परीक्षेसाठी अर्ज केला असेल तर तुमच्या साठी एक खास ऑफर आहे. आम्ही या परीक्षेची प्रश्नपत्रिका २ फेब्रुवारी पूर्वी तुम्हाला देऊ. मात्र, त्यासाठी ४० लाख रुपये द्यावे लागतील. जर तुम्हाला विश्वास नसेल तर या परीक्षेला एक ही रुपया नाही दिला तरी चालेल. फक्त आपली मूळ कागदपत्रे जमा करावे लागतील. त्यानंतर मुख्य परीक्षेला देखील प्रश्नपत्रिका दिली जाईल. काही विद्यार्थ्यांनी हे कॉल रेकॉर्ड केले आहेत. तसेच यात संबंधीत विद्यार्थी तुम्ही माझे मित्र तर नाही ना, की उगाच मस्करी करत आहात, अशीही विचारणा केली असून समोरच्या व्यक्तिने मी तुमचा कोणी मित्र नाही, तुमची तयारी असेल, नोकरी हवी असेल तर सांगा पुढची प्रक्रिया करूयात. तुमची सर्व माहिती आमच्याकडे आहे. फक्त या फोन कॉलबद्दल कोणाला काही बोलू नका, असे सांगितले.
ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. तसेच परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका अत्यंत कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित असून, पेपर फुटला नाही. मुलांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच असे दूरध्वनी आल्यास contact-secretary @mpsc .gov.in या ईमेलवर तक्रार दाखल करावी असे आयोगाने म्हटले आहे.
संबंधित बातम्या