Viral News: मुंबईतील अंधेरी येथे राहणारी पूजा गौड ही इयत्ता पहिलीत शिकत असताना शाळेबाहेरून बेपत्ता झाली होती. मात्र, गेल्या नऊ वर्षांनंतर ती पुन्हा आपल्या आईजवळ परतली आहे. परंतु, इतके वर्ष ती कुठे होती, तिच्यासोबत नेमके काय घडले होते आणि लेक आणि आईची भेट कोणी घडवून आणली? मन हेलावून टाकणाऱ्या आणि प्रसंगी थक्क करणारा या घटनेबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
दरम्यान, २०१३ साली पूजा इयत्ता पहिलीत शिकत होती. २२ जानेवारी २०१३ रोजी शाळेत गेलेली पूजा घरी परतलीच नाही. त्यानंतर घरच्यांनी तिचा शोध घेतला. मात्र, कुठेच पूजाचा पत्ता न लागल्याने तिच्या पालकांनी ती बेपत्ता झाल्याची जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पूजाची वाट पाहत अनेक वर्ष उलटली. यादरम्यान पूजाच्या वडिलांचेही निधन झाले. यानंतर पूजाचा आई पूनमनेही ती कधीच परतणार नाही, असे स्वत:च्या मनाला सांगितले आणि आशा सोडून दिल्या.
मात्र, काही दिवसांपूर्वी पूनम यांना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीच्या फोनवर व्हिडिओ कॉल आला, या व्हिडिओ कॉलमध्ये दुसरे- तिसरे कुणी नसून चक्क पूजा होती. आपल्या मुलीला पाहून पूनम कावरी-बावरी झाली. व्हिडिओ कॉलमध्ये दिसणारी मुलगी खरेच पूजा आहे का, याची शाहनिशा करण्यासाठी पूनमने काही प्रश्न विचारले, ज्याचे पूजाने अपेक्षित आणि बरोबर उत्तरे दिली. यानंतर ही पूजाच असल्याचे पूनमच्या लक्षात आले.
पूजा ही मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत एका इमारतीत लहान मुलांना सांभाळण्याच्या काम करत होती, त्याच घरात ३५ वर्षीय प्रमिला देवेंद्र या देखील काम करत होत्या. हळुहळू दोघींमध्ये एक घट्ट नाते तयार झाले. कामावर येताना पूजाचा चेहरा कायम उदास असायचा. अनेकदा डोळ्यात अश्रू असायचे, हे प्रमिला यांच्या लक्षात आले. घरची परिस्थिती चांगली नसेल म्हणून ती रडत असेल, असे प्रमिला यांना वाटायचे. परंतु, सात महिन्यानंतर पूजाने प्रमिला यांना तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. यावर प्रमिला यांचा विश्वास बसला नाही. मात्र, पूजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली ओळख पटवून दिल्यानंतर प्रमिला यांना मोठा धक्का बसला. प्रमिला यांनी वेळ न घालवता पूजाच्या आई-वडिलांचा शोध घ्यायला सुरुवात केली. पूजा हरवलेली जाहीरातीवर असलेल्या शेजारच्या रफीक यांच्या फोनवर व्हिडिओ कॉल केला. त्यावेळी रफीक यांनाही आश्चर्याचा मोठा धक्का बसला. कामावर पोहोचलेले रफीक त्वरीत पूजाच्या घरी निघाले. त्यानंतर रफीक यांनी व्हिडिओ कॉलद्वारे पूनम आणि पूजा यांची भेट करून दिली.
पूजा पहिलीच्या वर्षात शिकत असताना एका व्यक्तीने आईस्क्रीम खायला देतो, असे सांगून तिला पळवून नेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित दाम्पत्याला मूळ-बाळ नव्हते म्हणून त्यांनी पूजाचे अपहरण केले. परंतु, काही वर्षानंतर संबंधित दाम्पत्याला मुलगी झाली आणि त्यांनी पूजाला आपल्यापासून दूर केले. तसेच तिचा मानसिक आणि शाररिक छळ केला. पंरतु, प्रमिला यांच्यामुळे पूनम यांना आपली ९ वर्षापूर्वी हरवलेली मुलगी पुन्हा भेटली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.
संबंधित बातम्या