Ghatkopar accident : मुंबईतील कुर्ला येथे बेस्ट बसने अनेक लोकांना चिरडल्याची घटना ताजी असताना तशाच प्रकारच्या भीषण अपघाताची आणखी एक घटना समोर आली आहे. घाटकोपरमध्ये भीषण अपघात झाला असून भरधाव टेम्पोने ४ ते ५ पादऱ्यांना चिरडल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. घाटकोपरमधील चिरागनगर भागात आज (शुक्रवार) संध्याकाळच्या सुमारास हा अपघात घडला.
मुंबईतील कुर्ल्यामध्ये काही दिवसांपूर्वी बेस्ट बसने अनेकांना चिरडले होते. त्या अपघातात १० हून अधिकांचा बळी गेला होता. या अपघातानंतर रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर मुंबईतील घाटकोपरमधील आज आणखी एका अपघाताची घटना घडली आहे.
घाटकोपर चिरागनगर येथे मच्छी आणि भाजी मार्केट असलेल्या भागात हा अपघात झाला. भरधाव टेम्पोखाली ४ ते ५ जण चिरडले गेले. तसेच या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, या टेम्पोचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता, असा दावाही काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.
या प्रकरणी वाहनचालक उत्तम बबन खरात (वय २५) याला पोलिसांनी ताब्यात गेतलं आहे. उत्तम मद्यधुंद असल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि त्याने रस्त्यावरून चालणाऱ्या ४ ते ५ जणांना उडवले. या अपघातात प्रीती पटेल (वय ३५ ) या महिलेचा मृत्यू झाला.
या अपघातात रेश्मा शेख (२३ वर्ष), मारुफा शेख (२७ वर्ष), तोफा उजहर शेख (३८ वर्ष) आणि मोहरम अली अब्दूल रहीम शेख (२८ वर्ष) हे जखमी झाले आहेत. काहींना गंभीर दुखापत झाली आहे तर काहींना किरकोळ मार लागला आहे. जखमींना तात्काळ राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातानंतर जमावाने टेम्पो चालकाला पकडून बेदम चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी टेम्पो देखील ताब्यात घेतला आहे.
संबंधित बातम्या