राजकारणाने जातीत विष पेरले: माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राजकारणाने जातीत विष पेरले: माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे

राजकारणाने जातीत विष पेरले: माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे

HT Marathi Desk HT Marathi
Jan 07, 2025 12:47 PM IST

पत्रकार अविनाश महालक्ष्मे लिखित ‘घानमाकड’ पुस्तकाचे प्रकाशन कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांच्या हस्ते नागपुरातील बीआरए मुंडले स्कूलच्या प्लॅटिनम ज्युबिली सभागृहात पार पडले.

'घानमाकड' पुस्तकाचे नागपुरात प्रकाशन
'घानमाकड' पुस्तकाचे नागपुरात प्रकाशन

‘पूर्वी ग्रामीण भागात जातींचा उल्लेख सहजतेने व्हायचा. त्यात कुणालाही वाईट वाटत नव्हते. नात्यांमध्ये सहजता आणि नैसर्गिकता होती. गुण्यागोविंदाने सुरू असलेल्या या नात्यांत विष पेरण्याचे काम राजकारणाने केले’, अशी खंत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ पत्रकार अविनाश महालक्ष्मे लिखित ‘घानमाकड’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. चांदे यांच्या हस्ते नुकतेच नागपुरातील बीआरए मुंडले स्कूलच्या प्लॅटिनम ज्युबिली सभागृहात पार पडले. त्यावेळी डॉ. चांदे बोलत होते. यावेळी साहित्य अकादमीचे सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे,  दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक श्रीपाद अपराजित उपस्थित होते.

‘घानमाकड' या पुस्तकातून प्रामाणिक शब्दातून ग्रामीण जीवनातील अस्सल वास्तव मांडण्यात आले असून यात प्रासादिकता आणि सूक्ष्म निरीक्षण असल्याचे डॉ. चांदे म्हणाले. ‘घानमाकड' ही प्रत्येक गावात नसते. घाण्याचा बैल गोलगोल फिरतो त्यासारखे हे लाकूड फिरते. मेरी गो राउंडपेक्षाही प्राचीन असलेला हा खेळ खेळताना माकडासारखे बिलगून राहावे लागत असल्याने या खेळासाठी ‘घानमाकड’ अशा शब्द रूढ झाला. तेव्हाच्या ग्रामीण जीवनात सलोखा होता. आपुलकीचे नाते होते, असे डॉ. चांदे म्हणाले.

प्रश्न निर्माण करणाऱ्या लिखाणात नावीन्यता

‘सहजता ही आता आपल्या जीवनात राहिलेली नाही. सहजता असेल तरच ती लेखनात उतरते. लिखानाची निरागसता आपण हिरावून बसलो आहे. त्यातही सोपे लिहिणे अतिशय कठीण काम आहे. माणसांमध्ये रूची असणारा व्यक्तीच दर्जेदार लिखाण करू शकतो. 'घानमाकड' पुस्तकातून वास्तवातील लालित्य मांडण्यात आले आहे. प्रश्न निर्माण करणाऱ्या लिखाणात नावीन्यता असते. इतिहास भूगोल भावात्मक पद्धतीने मांडण्याचे कौशल्य महालक्ष्मे यांच्यात आहे’, असं डॉ. प्रमोद मुनघाटे म्हणाले.

‘महानगरीय संस्कृतीमुळे आज गावांच्या आठवणी धूसर होत चालल्या असताना विस्मृतीत जाऊ बघणाऱ्या गावपणाला भानावर आणण्याचे काम ‘घानमाकड’ करेल’, असा विश्वास श्रीपाद अपराजित यांनी व्यक्त केला. गावाच्या विकासातूनच खरा अंत्योदय साधला जाईल, असे ते म्हणाले. गावातील मातीशी असलेले ऋण फेडणे हा या पुस्तकामागील उद्देश असल्याची भावना पुस्तकाचे लेखक अविनाश महालक्ष्मे यांनी व्यक्त केली.

संजय वलीकर यांनी या पुस्तकातील ‘स्कॉयलॅब’ प्रकरणाचे वाचन केले. ज्या गावावर हे पुस्तक लिहिण्यात आले त्या शिरपूर गावाची सफर घडविणारी इशांत महालक्ष्मे यांनी बनविलेली चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. बळवंत भोयर यांनी लेखकाचा परिचय करून दिला. पुस्तकाचे मुखपृष्ठ व आतील रेखाटने प्रा. अजय रायबोले यांची आहेत. नागपूरच्या विजय प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. सूत्रसंचालन निलिमा हारोळे यांनी केले तर आभार वैशाली महालक्ष्मे यांनी मानले. , शिरपूर गावचे सरपंच गणेश डाहुले उपस्थित होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर