Mumbai GBS News: मुंबईत गुइलेन-बॅरे सिंड्रोम म्हणजेच जीबीएस या दुर्मिळ आजाराचा पहिला पहिला रुग्ण आढळला आहे. अंधेरी पूर्व परिसरीसरातील एका ६४ वर्षीय महिलेचे चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णावर सध्या पालिकेच्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. या महिलेला ताप आणि जुलाबाचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
महाराष्ट्रात दिवसेंदिवस जीबीएस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात प्रमुख्याने पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असून नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने सांगितले की, आतापर्यंत एकूण १७३ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १४० रुग्णांना गिलेन-बॅरे सिंड्रोम असल्याचे निदान झाले. एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एक मृत्यू जीबीएस म्हणून पुष्टी झाली आणि ५ संशयित मृत्यूंची नोंद झाली.
पुण्यात वाढत्या जीबीएस प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी पुणे महापालिकेने पुणे शहरातील सिंहगड रोडवरील नांदेड गाव, धायरी व परिसरातील ३० खासगी पाणीपुरवठा प्रकल्प सील केले होते. या भागात जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने पुणे महानगर पालिकेने हा निर्णय घेतला. गेल्या दोन दिवसांत या प्रकल्पांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मनपाच्या एका अधिकाऱ्याने गुरुवारी दिली.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने गुरुवारी जिल्ह्यातील संशयित गिलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) रुग्णांमध्ये सहावा मृत्यू नोंदविला. कर्वे नगरयेथे राहणाऱ्या ६३ वर्षीय व्यक्तीचा काशीबाई नवले रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर म्हणाल्या, 'राज्यात आतापर्यंत सहा संशयित जीबीएस मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी केवळ एका मृत्यूची पुष्टी जीबीएस म्हणून झाली आहे आणि उर्वरित पाच मृत्यू संशयित जीबीएस मृत्यू आहेत.
ताप, जुलाब, खालच्या अंगात अशक्तपणा आणि चालता येत नसल्याने त्यांना २८ जानेवारी २०२५ रोजी काशीबाई नवले रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना आयव्हीआयजी देण्यात आले, मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी, ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी मृत्यूची नोंद करण्यात आली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृत्यूचे तात्कालिक कारण तीव्र इस्केमिक स्ट्रोक, मधुमेह मेलिटस आणि जीबीएस असल्याचे सांगितले जाते. मात्र, मृत्यूचे मूळ कारण समजण्यासाठी शवविच्छेदन करण्यात आल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली.
संबंधित बातम्या