पुण्यात गे डेटिंग ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तरुणाचे अपहरण करत लुटले
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यात गे डेटिंग ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तरुणाचे अपहरण करत लुटले

पुण्यात गे डेटिंग ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तरुणाचे अपहरण करत लुटले

Published Oct 14, 2024 11:38 PM IST

Pune Gay Dating app fraud: गे डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणांना फसवून त्यांना निर्जनस्थळी बोलावून अपहरण करून लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पुणे ग्रामीण पोलिसांनी केला.

पुण्यात गे डेटिंग ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तरुणाचे अपहरण करत लुटले
पुण्यात गे डेटिंग ॲपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तरुणाचे अपहरण करत लुटले

Pune Gay Dating app fraud: पुण्यातील ग्रामीण भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ऑनलाइन गे डेटिंग अॅपच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढून त्यांना निर्जन स्थळी बोलावून अपहरण करत लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पुणे ग्रामीण पोलिसांनी केला आहे. या प्रकारच्या तीन ते चार घटना उघडकीस आल्या असून तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

सुशांत पोपट नागरे (वय २५, रा. प्रेमभारती नगर, बोल्हेगाव ता.जि. अहमदनगर), मयुर राजू गायकवाड, (वय २४ रा. गांधीनगर चौथे कॉलनी, बोल्हेगाव अहमदनगर, श्रेयस भाउसाहेब आंग्रे (वय २४, रा. संभाजीनगर, नागापूर अहमदनगर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या कडून गुन्हयात वापरलेली कार देखील जप्त करण्यात आली आहे,

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्रापुर येथे एका तरुणांचे काही जणांनी अपहरण करून त्याला लुटले होते. पीडित व्यक्तिने आरोपींच्या तावडीतून सुटका करत थेट पोलिस ठाणे गाठले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला असता, तरुणाचे अपहरण झाल्याचे उघड झाले होते. पीडित फिर्यादीचे शिक्रापुर येथील जय मल्हार खानावळ पासून मुंबईला जाण्याचा पत्ता विचारण्याचे बहाण्याने गाडीत बसून अपहरण करण्यात आले होते. तिघा आरोपीनी फिर्यादीस मारहाण करून मोबाईल आणि इतर वस्तु काढून घेत लुटले. दरम्यान, कारेगाव येथे पाण्याची बाटली घेण्यासाठी आरोपी उतरले असता, फिर्यादीने संधी साधून गाडीतून पळ काढला. यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा तपास ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक करत असतांना धक्कादायक माहिती पुढे आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी हे नगर जिल्हयातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली. या सर्वांना पोलिसांनी अटक केली. त्यांची चौकशी केली असताना आणखी धक्कादायक माहिती पुढे आली.

ग्रींडर गे डेटींग अॅपचा वापर करून तरुणांची फसवणूक

आरोपींकडे सखोल चौकशी केली असता, आरोपींनी ग्रींडर गे डेटींग अॅपचा वापर करत या तरुणाला फसवून त्याला बोलवलं असल्याचं निष्पन्न झालं. त्याला अज्ञात स्थळी बोलावून त्याला त्याचे अश्लील फोटो दाखवून ब्लॅकमेल करत गाडीत बसवून त्याच्याकडून आरोपींनी पैसे उकळले. आरोपींनी शिक्रापूर परिसरात अशा प्रकारचे तीन व लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत एक अशा एकूण चार जणांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झालं आहे. या घटनांमधील पिडीत व्यक्तींचा शोध चालू असून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

यातील आरोपी मयूर गायकवाड याच्यावर दोन गुन्हे दाखल असून आरोपी सुशांत नागरे याच्यावर देखील एक गुन्हा दाखल आहे, दोघेही अहमदनगर जिल्हयाचे रेकार्डवरील आरोपी आहेत. ग्रीडर डेटींग अॅप अगर इतर मोबाईल अॅप द्वारे संपर्कात येवून कोणत्याही नागरीकांना लुटण्यात आले असल्यास अगर ब्लॅकमेल केले जात असल्यास त्यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर