Gautami Patil Diwali Pahat Program: देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. दिवाळीनिमीत्त अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर शाब्दिक हल्ला चढवला आहे.यावेळी अंधारेंनी शिंदे गटाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीही आठवण करून दिली.
“दिवाळी पहाटनिमित्त आम्ही पंडीत बिस्मिल्ला साहेबांची सनई, पंडीत भीमसेन जोशी यांची भक्तीगीते किंवा पद्मजा फेणानी यांचा गोड गळा हे सगळे ऐकून होतो. आज ठाण्यामध्ये उजाडलेली दिवाळी पहाट ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनाच काय? अवघ्या महाराष्ट्रालाही अपेक्षित नसेल”, अशा शब्दात सुषमा अंधारे शिंदे गटावर बरसल्या आहेत.
या कार्यक्रमानंतर गौतमी पाटीलने प्रसार माध्यमांशी संवाद साधत सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ठाणेकरांचे प्रेम कसे वाटले? असा प्रश्न विचारला असता गौतमी पाटीलने खास उत्तर दिले आहे. तिने स्मितहास्य करत 'एक नंबर' असे उत्तर दिले.
पुढे गौतमी पाटील म्हणाले की,"ठाण्यात येऊन खूप छान वाटले. मुंबईतील प्रेक्षक मला खूप आवडतात. त्यांच्याकडून मला नेहमी प्रेम मिळाले. पहाटे पाच वाजल्यापासून प्रेक्षक कार्यक्रमस्थळी थांबले होते. यामुळे मला खूप छान वाटले. सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा."