Gautami Patil Dance Show In Ashti Beed : चिमुकल्याच्या वाढदिवशी वडिलांनी गौतमी पाटीलचा शो ठेवल्याची घटना ताजी असतानाच आता बीडमध्ये बायकोच्या वाढदिवसानिमित्त नवऱ्यानं थेट गौतमी पाटीलचा डान्स शो आयोजित केल्याची घटना समोर आली आहे. वाढदिवसाच्या जंगी सेलिब्रेशनला आणि गौतमी पाटीलचा डान्स पाहायला तरुणांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली. बीड जिल्ह्यातील आष्टी शहरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याला भाजपा आमदार सुरेश धस यांनी देखील हजेरी लावली. या कार्यक्रमाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या आष्टी शहरातील किरण गावडे यांनी त्यांची पत्नी प्रगती गावडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं थेट नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी गौतमी पाटीलने केक कापून प्रगती गावडे यांचा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर गौतमी पाटील यांचा डान्स पाहण्यासाठी जिल्ह्यातील अनेक ठिकाणांहून तरुणांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. गौतमी पाटीलचा डान्स सुरू झाल्यानंतर तरुणांनी शिट्ट्या वाजवत आणि 'सबसे कातिल गौतमी पाटील'च्या घोषणा द्यायला सुरुवात केली. याशिवाय काही तरुणांनी मंडपातच भन्नाट डान्स करायला सुरुवात केली. त्यामुळं अनेकांनी या मजेशीर कार्यक्रमाचा आनंद लुटला.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांची मोठ्या संख्येनं हजेरी असते. त्यामुळं काही अतिउत्साही तरुण गौतमी पाटीलला पाहण्यासाठी घरावर किंवा झाडावर चढतात, त्यामुळं अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. याशिवाय गौतमी पाटीलच्या कार्यक्रमातच तरुणांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचीही घटना समोर आलेली आहे. त्यामुळं आता गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि तरुणांची हुल्लडबाजी असे प्रकार सातत्यानं घडत असल्यामुळं चिंता व्यक्त केली जात आहे.
संबंधित बातम्या