duplicate garlic found in akola : स्वयंपाक घरात कांद्यानंतर अत्यंत गरजेचा पदार्थ म्हणजे लसूण. मात्र सध्या लसणाचे भाव गगनाला भिडल्याने लसूण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. याचा फायदा लसणाचा काळाबाजार करणारे घेत असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अकोल्यात चक्क सिमेंटचा लसूण विक्री होत असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. या विचित्र फसवणुकीमुळे लोक आश्चर्यचिकत झाले आहेत.
हा अजब प्रकार अकोला शहरात घडला आहे. येथील बहुतांश भागात फेरीवाले रोज भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येत असतात. यातल्याच काही फेरीवाल्यांकडे डुप्लिकेट लसूण विक्री होत असल्याचे दिसत आहे. अकोला शहरातील बाजोरिया नगर परिसरात राहणाऱ्या सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी सुभाष पाटील यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सुभाष पाटील यांच्या पत्नीनं दारावर भाजीपाल विक्रीसाठी आलेल्या फेरीवाल्याकडून पाव किलो लसूण खरेदी केला होता. बाजारभावापेक्षा थोडा कमी दराने तो विकत होता. त्यांनी लसूण घरात आणला असता त्यात काही गाठी दिसल्या. त्या हुबेहुब लसणासारख्याच दिसत होत्या. त्यांनी लसून सोलण्याचा प्रयत्न केला मात्र हाताने सोसला जात नव्हात. आपटला तरी पाकळ्या निघत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी त्या गाठी चाकूनं कापल्या, तेव्हा त्या लसणासारख्या दिसणाऱ्या गाठी सिमेंटने बनवल्या असल्याचे समोर आले. लसणासोबत सिमेंटच्या गाठी टाकून वजनात काळाबाजार करण्याचा हा प्रकार आहे. अशा फसवणुकीपासून ग्राहकांनी सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
हा लसूण कृत्रिम पद्धतीने सिमेंटचा वापर करून बनवला आहे. लसूण सोलताना त्याच्या पाकळ्या वेगळ्या होत नव्हत्या त्यामुळे सदर लसणाच्या गाठीला चाकूच्या सहाय्याने कापले असता ही गाठ सिमेंटची असल्याचे समोर आले. त्यावर पांढऱ्या रंगाचा वापर केला होता.या लसाणाच्या गाठीचे वजन १०० ग्रॅम इतकं आहे.
सध्या प्रतिकिलो लसणाचे दर काही शहरांमध्ये ३०० ते ३५० रुपयांच्या घरात गेले आहे. त्यातच लसणाचा काळाबाजार करणाऱ्या टोळ्या बाजारपेठेत सक्रिय झाल्या असून या टोळ्या फेरीवाल्यांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करीत असल्याचे समोर आले आहे.