गणेशोत्सव सुरू आहे. गणेशोत्सवात सध्याच्या ट्रेंडनुसार अनेकजण विविध देखावे साकारतात. काहीजण या देखाव्यातून एखादा संदेश देऊन जातो. अनेक सार्वजनिक मंडळ असो वा घरी असो आताच्या ट्रेंडनुसार गणपती बाप्पाच्या मुर्तीही आकर्षक असतात आणि देखावेही संदेश देणारे असतात. असेच डोंबिवलीच्या एका युवकाने आपल्या इमारतीतील गणपतीच्या येथे कल्याण डोंबिवलीतच आय टी पार्क व्हावे असा संदेश दिला आहे.
मुंबईतील लोकलला होणारी गर्दी ही जीवघेणी असते. तर डोंबिवलीत रोजच्या रोज घडणाऱ्या मृत्युच्या घटना लक्षात घेऊन तरुणांच्या एका गटाने डोंबिवलीत आयटी पार्क बांधण्याची मागणी करत त्यांच्या इमारतीत गणपतीचा देखावा तयार केला आहे. जेणेकरून स्थानिक रहिवाशांना रोजगार मिळेल आणि मुंबईला जाणाऱ्या गर्दीचा प्रवास करताना अनेकांना जीवघेण्या अपघातापासून वाचवता येईल.
डोंबिवली (पूर्व) येथील ९० फूट रोडवर राहणारा ३१ वर्षीय रुपेश राऊत याने ही सजावट केली आहे. राऊत हे आयटी क्षेत्रात काम करतात आणि त्यांना प्रवाशांचे हाल माहीत आहेत. हजारो लोकांना रेल्वेने धोकादायक प्रवास करावा लागतो. कल्याणहून डोंबिवलीत येणाऱ्या गाड्या खचाखच भरलेल्या असतात. परिणामी, डोंबिवलीतील प्रवाशांना चढण्यासाठी आणि उभे राहण्यासाठी पुरेशी जागाही मिळत नाही. त्यामुळे दाराशी लटकावे लागते आणि याच्या परिणामी अनेकांना मृत्युच्या दारी जावे लागते.
गेल्या जानेवारी पासून आता पर्यंत डोंबिवली-दिव्या दरम्यान २४ जणांचा लोकलंच्या गर्दीतून पडून मृत्यू झाला. आणि २०२३ मध्ये हाच नंबर ४०० मृत्य आणि ८०० जखमी एवढा होता. लोकलला होणारी ही गर्दी दिवसेंदिवस जीवघेणी बनत चाली आहे.
डोंबिवलीतील या इमारतीत मित्रांनी मिळून बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये दाखवणारे आयटी पार्क मॉडेल तयार केले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी त्यांच्या गणपतीच्या सजावटीने डोंबिवलीत कॅन्सर हॉस्पिटलची गरज असलेला देखावा साकारला होता. योगायोगाने नंतर कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी बांधण्याचे आश्वासन दिले. या वर्षी लोकलमधून पडून अपघात होण्याचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढले आहे, त्यामुळे आयटी पार्कचा हा देखावा साकारला आहे.
गेल्या काही वर्षात कल्याण डोंबिवली मध्ये वस्तींची फार वाढ झाली आहे. याचा परिणाम म्हणजे नोकरीला मुंबईकडे जावे लागते आणि लोकलला गर्दी होते. ही गर्दी जीवघेणी आहे शिवाय कुटुंबाला वेळही देता येत नाही. यासाठी गरज आहे रोजगार निर्मितीची आणि भव्य आय टी पार्क ची.