MLA Ganpat Gaikwad shooting case: शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते महेश गायकवाड आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यात जमिनीवरुन वाद निर्माण झाला होता. या वादातून आमदार गायकवाड यांनी उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस ठाण्यातच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेने राज्यभर खळबळ माजली होती. याचे पडसाद राज्याच्या विधानसभेतही उमटले होते. अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील या जमिनीचा वाद पुन्हा उफाळला असल्याचे समोर आलं आहे.
या जागेचा कब्जा घेण्यासाठी एक बिल्डर गावगुंडांसह, बंदुका आणि अन्य हत्यारं घेऊन गेला होता. याची माहिती मिळताच महेश गायकवाड यांनी पोलिसांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, पोलिसांनी हत्यारासह गुंडांना ताब्यात घेतलं आहे. या जमिनीचा वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या जमिनीच्या वादातून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करून त्यांना जखमी केल्याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड सध्या तुरुंगात आहेत.या प्रकरणात आमदार गणपत गायकवाड यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला . या गोळीबारात जखमी झालेले महेश गायकवाड पुन्हा राजकारणात सक्रीय असून आता जमिनीच्या वादाने पुन्हा डोकं वर काढले आहे. अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात ही जमीन असून आता यावर कब्जा मिळवण्यासाठी बिल्डरने हालचाली सुरु केल्यानं पुन्हा वातावरण तापलं आहे.
अंबरनाथमधील ही वादग्रस्त जमिनीच्या मोजणीस बंदी असूनही बिल्डर गावगुंडांना घेऊन याचा ताबा घेण्यासाठी आला होता. याची माहिती शेतकऱ्यांनी महेश गायकवाड यांना दिल्यानंतर गायकवाड शिंदे गटाचे कार्यकर्ते तसेच पोलिसांना घेऊन संबंधित जमिनीवर पोहोचले. पोलिसांनी या गुंडांना शस्त्रास्त्रांसह पकडले आहे. या गुंडांनी जमीन मोजणीस विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण केल्याचं सांगितले जात आहे.
याप्रकरणी महेश गायकवाड यांनी सांगितले की, या जमिनीचा सर्व्हे सुरु होता. मात्र तेथे काहीच पोलीस बंदोबस्त नव्हता. आमदार गणपत गायकवाड यांचा पार्टनर जो बिल्डर असून गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याने गावगुंड सोबत आणले होते. त्यांच्याकडे बंदुका अन्इ तर हत्यारे होती. त्यांनी शेतकऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने जमीन बळकवण्याचा प्रयत्न केला.