hadapsar murder : दारूच्या पैशाच्या वादातून अल्पवयीन मुलांनी केला कुख्यात गुंड राजू शिवचरणचा खून; पुण्यातील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  hadapsar murder : दारूच्या पैशाच्या वादातून अल्पवयीन मुलांनी केला कुख्यात गुंड राजू शिवचरणचा खून; पुण्यातील घटना

hadapsar murder : दारूच्या पैशाच्या वादातून अल्पवयीन मुलांनी केला कुख्यात गुंड राजू शिवचरणचा खून; पुण्यातील घटना

Updated Aug 09, 2024 05:53 PM IST

hadapsar murder : पुण्यात हडपसर येथील रामटेकडी परिसरात कुख्यात गुंड राजू शिवचरण याचा काही अल्पवयीन मुलांनी दगडाने ठेचून खून केला.

दारुसाठी पैसे मागण्याच्या वादातून अल्पवयीन मुलांनी केला कुख्यात गुंड राजू शिवचरणचा खून; पुण्यातील घटना
दारुसाठी पैसे मागण्याच्या वादातून अल्पवयीन मुलांनी केला कुख्यात गुंड राजू शिवचरणचा खून; पुण्यातील घटना

hadapsar murder : पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे. कोयता गँग, खून, दरोडा या घटना रोजच्या झाल्याने पुण्यातील कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यातील हडपसर येथील रामटेकडी परिसरात दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून एका अट्टल गुन्हेगाराचा काही अल्पवयीन मुलांनी दगडाने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली असून पोलिसांनी या प्रकरणी पाच अल्पवयीन मुलांना अटक केली आहे.

राज उर्फ राजू शिवचरण (वय ३६, रा. रामटेकडी, हडपसर) असे खून झालेल्या अट्टल गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी राजुचा भाचा निखिल कैलास चव्हाण, (रा. वंदे मातरम चौक गणपती मंदिर मागे, रामटेकडी, हडपसर) याने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. राजू शिवचरण हा हडपसर परिसरातील कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. शिवचरण व आरोपी अल्पवयीन मुले हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत.

गुरुवारी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास रामटेकडीतील वंदेमातरम चौकात शिवचरण व अल्पवयीन मुले एकत्र आले होते. यावेळी दारूसाठी पैसे मागितल्याने वाद झाला. गुंड शिवचरण व आरोपी मुले दारूच्या नशेत होती. यावेळी आरोपी मुलांनी शिवचरणकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र, हे पैसे देण्यास त्याने नकार दिल्याने अल्पवयीन मुलांना राग आला. त्यांनी शिवचरणला दगड, विटांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी शिवच रणच्या डोक्यात एक मोठा दगड घातला तर काहींनी त्याच्या डोक्यावर दारूच्या बाटल्या फोडल्या.

यात शिवचरण हा गंभीर जखमी झाला होता. ही घटना पोलिसांना कळल्यावर त्यांनी घटनास्थळी जात गंभीर जखमी झालेल्या शिवचरणला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. वानवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी काही वेळातच सर्व अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. येथे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून पोलिसांनी कारवाई करून गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर