भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेला शिंदे गटाचा कार्यकर्ता महेश गायकवाड यांना आज ठाण्याच्या ज्युपिटर हॅास्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. महेश गायकवाड शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख आहेत. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होते. गायकवाड यांच्यावर २ फेब्रुवारी रोजी गोळीबार करण्यात आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्बल २४ दिवसानंतर आज महेश गायकवाड यांना डिस्चार्ज मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी २ फेब्रुवारी रोजी महेश गायकवाड आणि सहकारी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला होता. त्यांच्यात जमिनीवरून वाद सुरू होता. या वादातूनच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या. तसेच राहुल पाटील यांच्यावरही गोळीबार झाला होता. दोघांना तातडीने ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्या स्वागताची समर्थकांकडून जय्यत तयारी करण्यात आली. शिंदे गटाकडून शहरात जागोजागी बॅनर लावून त्यांचे स्वागत करण्यात आले. ठाणे, कल्याण व डोंबिवली भागात शिवसेनेकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी करत शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यामुळे शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या गोळीबार प्रकरणात उल्हासनगर चोपडा कोर्टाकडून आमदार गणपत गायकवाडसह पाच जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. सर्व आरोपींना तळोजा कारागृहात हलविण्यात आले आहे.