देशीकट्टा दाखवून कार अडवली, बाहेर येताच झाडल्या गोळ्या; नागपुरात दिवसाढवळ्या कुख्यात गुंडाची हत्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  देशीकट्टा दाखवून कार अडवली, बाहेर येताच झाडल्या गोळ्या; नागपुरात दिवसाढवळ्या कुख्यात गुंडाची हत्या

देशीकट्टा दाखवून कार अडवली, बाहेर येताच झाडल्या गोळ्या; नागपुरात दिवसाढवळ्या कुख्यात गुंडाची हत्या

Jan 03, 2025 01:58 PM IST

Nagpur Murder: नागपूरमध्ये दिवसाढवळ्या एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली.

नागपुरात दिवसाढवळ्या कुख्यात गुंडाची हत्या
नागपुरात दिवसाढवळ्या कुख्यात गुंडाची हत्या

Nagpur Gang War: नागपुरात दिवसाढवळ्या कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. मृत व्यक्ती आपल्या पाच मित्रांसह देवदर्शन करून परत असताना दुचाकीने आलेल्या दोन गुंडांनी त्यांना वाटेतच अडवले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, कारमधील इतर तीन जण शेतात पळून गेल्याने त्यांचा जीव वाचला. याप्रकरणी खापरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली.

पवन धीरज हिरणवार (वय, २८) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पवन हा नागपूर येथील काचीपुरा येथे वास्तव्यास होता. तर, शैलेश उर्फ बंटी हिरणवार (वय, ३१) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पवन, शैलेश हे आपल्या इतर तीन मित्रांसह कारने बाभूळखेडा येथील पंचमुख हनुमान मंदिरात दर्शनाला गेले होते. त्यानंतर परत येत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी देशीकट्टा दाखवून त्यांची कार अडवली. पवन खाली उतरताच दोघांपैकी एकाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेत पवन याचा जागीच मृत्यू झाला. तर, शैलेशच्या कानाजवळ गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला. हा संपूर्ण प्रकार खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाभूळखेडा- चिचोली यथे घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. तर, शैलेश यालाही याच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नागपूर येथील गँगस्टर शेखू खान याने पवन याची हत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पवन आणि त्याच्या साथीदाराने दोन वर्षांपूर्वी शेखूचा भाऊ सरोज खानची चाकूने वार करून हत्या केली होती. भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी शेखूने हा हल्ला केला असावा, असे बोलले जात आहे.

नागपुरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी वाढली असून पोलिसांचा वचक संपला आहे. गुन्हेगाराने तोंड वर काढले असून गेल्या काही दिवसांत एकापठोपाठ एक हत्याकांडच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अशा घटनांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र समोर आले आहे. नागपुरातील गुन्हेगारी संपवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत. मात्र, तरीही गुन्हेगारी कमी व्हायचे नाव घेईना. नागपूर बिहारच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे स्थानिक लोक बोलत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर