Palghar News: पालकांच्या चिंतेत भर घालणारी माहिती समोर येत आहे. पालघर जिल्ह्यात लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली असून दोन मुलांची सुटका केली आहे. या टोळीत आणखी काही लोक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे पालघर नव्हेतर राज्यातील प्रत्येकाने आपल्या मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील क्रोटी पुलाखाली शुक्रवारी रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पथकाला काही जण एकमेकांशी भांडताना दिसले. काही वेळाने भांडण मिटण्याऐवजी आणखी पटले. यामुळे पोलिसांनी मध्यस्ती करून त्यांच्यातील भांडण सोडवले. मात्र, त्यांच्यासोबत आठ आणि पाच वर्षांची दोन मुले दिसून आल्याने पोलिसांना वेगळाच संशय आला. यामुळे पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिले. मात्र, त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी कल्याण येथून या दोन मुलाचे अपहरण केल्याची कबूली दिली.
याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या ६ जणांच्या टोळीमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. दोन्ही लहान मुलांची सुटका करून त्यांना कल्याण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपी सांगली जिल्ह्यातील मिरज येथील रहिवासी आहेत. आरोपींनी आतापर्यंत किती मुलांचे अपहरण केले आहे आणि त्यांची किती जणांची टोळी आहे? तसेच अपहरण केलेल्या मुलांचे काय केले जाते? याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र, या घटनेनंतर पालकांमध्ये भिती पसरली आहे.
पालघरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातून एका ३० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. वाडा तालुक्यातील नेहरोली येथील मुकुंद बेचरदास राठोड (७५), त्यांची पत्नी कांचन राठोड (७२) आणि अपंग मुलगी संगीता राठोड (५२) यांचे कुजलेले मृतदेह ३० ऑगस्ट रोजी त्यांच्या घरात आढळून आले होते. पालघर पोलिसांच्या तपासात राठोड दाम्पत्याचा भाडेकरू असलेल्या आरिफ अन्वर अली (३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने कुटुंबाला लुटण्यासाठी १७ ऑगस्ट रोजी ही हत्या केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांची हत्या केल्यानंतर अली आपल्या कुटुंबासह उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी पळून गेला. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईत राहणारा राठोड यांचा मुलगा पंकज याने १७ ऑगस्ट रोजी वडिलांना मोबाइलवर फोन केला. मात्र, दिवसभर फोन बंद होता. काही तरी गडबड झाल्याचा त्याला संशय आला आणि त्याने शेजाऱ्याला आपल्या कुटुंबाची चौकशी करण्याची विनंती केली.
शेजारी जेव्हा घरात गेला तेव्हा त्याला घर आणि वरच्या मजल्यावरील भाड्याची खोली बाहेरून कुलूप लावलेली दिसली. अखेर ३० ऑगस्ट रोजी पंकज व त्याचा भाऊ सुहास वाड्यापासून २८ किलोमीटर अंतरावर असलेल्या नेहरोली येथील त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या वडिलांचा मृतदेह कुजलेला अवस्थेत स्वच्छतागृहाजवळ पडलेला व बेडशीटने झाकलेला आढळला. तर, संगीता आणि कांचन यांचा मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळला.
संबंधित बातम्या