Ganeshotsav In Kashmir Valley : काश्मीर खोऱ्यात या वर्षीही मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. काश्मीर खोऱ्यात शांतता नांदावी व सर्वधर्मीय एकोप्याने रहावे या हेतूने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख व युवा उद्योजक पुनीत बालन यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून पुण्यातील सात गणपती मंडळांच्या सहकार्याने काश्मीर खोऱ्यात गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या वर्षी काश्मीरमध्ये तीन ठिकाणी हा गणेशोत्सव साजरा होणार आहे. या साठी पुण्यातील मानाच्या गणेश मंडळांच्या बाप्पाच्या मुर्ती विधीवत पूजा करून मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे देण्यात आल्या आहेत.
काश्मीर खोऱ्यात गेल्या वर्षी लाल चौकात दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. या वर्षी तीन ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. साऊथ काश्मीर अनंतनाग येथे गणेश मंडळ ५ दिवस हा उत्सव साजरा करणार आहेत. या तीन गणेश मंडळांना शनिवारी मानाच्या गणपतीच्या मूर्ती विधीवत पूजा करून देण्यात आल्या आहेत.
पुण्यातील मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळाची प्रतिकृती गणेश मूर्ती ही कश्मीरमधील लाल चौकातील ‘गणपतीयार ट्रस्ट’ला सुपूर्द करण्यात आली. तर मानाचा तिसरा गणपती ‘गुरूजी तालीम गणेश मंडळा’ची प्रतिकृती कुपवाडा येथील गणेश मंडळाला सुपुर्द करण्यात आली. मानाच्या चौथ्या ‘तुळशीबाग गणेश मंडळा’ची प्रतिकृती साऊथ काश्मीर, अनंतनाग येथील गणेश मंडळाला देण्यात आणि आहे. काश्मीर खोऱ्यातील गणेश मंडळांचे पदाधिकारी मोहित भान, संदीप रैना, संदीप कौल, नितीन रैना यांना या मूर्ती देण्यात आल्या आहेत.
या बाबत पुनीत बालन म्हणाले, पुण्यातील प्रमुख सात गणपती मंडळाच्या सहकार्याने गतवर्षी काश्मीरमधील लाल चौकातून गणेशोत्सवाला सुरूवात झाली. दहशतवादी कारवाईची कोणतीही भीती न बाळगता या मंडळाचे कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि शांततेसाठी असलेली ही चळवळ पुढे नेण्याची त्यांनी विनंती केली. त्यांनीच यंदा काश्मीरमध्ये तीन ठिकाणी हा उत्सव साजरा करण्याची विनंती केली होती. यामुळे पुण्याची सांस्कृतिक परंपरा जपणारा हा उत्सव काश्मीरमध्ये साजरा होत आहे. त्याचा कश्मीर खोऱ्यात विस्तार होतोय, याचा मला आनंद आहे. या गणेशोत्सवामुळे भारताचा स्वर्ग असलेल्या काश्मीरमध्ये शांतता नांदो, हीच बाप्पा चरणी प्रार्थना.