मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ganeshotsav 2023 : खूषखबर! गणपतीसाठी गावाकडं जाणाऱ्या भाविकांना टोल माफ; राज्य सरकारची घोषणा

Ganeshotsav 2023 : खूषखबर! गणपतीसाठी गावाकडं जाणाऱ्या भाविकांना टोल माफ; राज्य सरकारची घोषणा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Sep 15, 2023 06:21 PM IST

toll free passes for Ganeshotsav : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या गणेशभक्तांना राज्य सरकारनं गोड बातमी दिली आहे.

Ganpati Festival 2023
Ganpati Festival 2023

Ganeshotsav toll free travelling : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना टोल टॅक्समधून सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तसं पत्रक आज राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

सरकारनं प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार १६ सप्टेंबर २०२३ ते १ ऑक्टोबर २०२३ असे सलग १६ दिवस कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोल माफ असेल. या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील अन्य मार्गावरील पथकरातून गणेशभक्तांच्या वाहनांना व एसटी महामंडळाच्या वाहनांना सूट मिळणार आहे.

कुठे मिळतील टोल फ्री पास?

गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांना वाहतूक पोलीस चौकी किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) टोल फ्री पास मिळतील. या पासेसवर 'गणेशोत्सव २०२३, कोकण दर्शन', वाहन क्रमांक व चालकाचे नाव नमूद असेल.

एसटी महामंडळाच्या वाहनांना त्या-त्या जिल्ह्यातील पोलीस खाते किंवा आरटीओकडून पास उपलब्ध करून देण्यात येतील.

टोल माफीचे हे पास परतीच्या प्रवासासाठी देखील ग्राह्य धरले जाणार आहेत. 

टोलमाफी बरोबरच प्रवासादरम्यान भाविकांना अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. 

गणेशभक्तांना मोठा दिलासा

महाराष्ट्राच्या गावागावांत गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या उत्सवाच्या तयारीसाठी व उत्सवाच्या दिवसांतही मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांतून मोठ्या संख्येनं गणेशभक्त सहकुटुंब गावाला जातात. त्यासाठी चार-पाच महिने आधीच रेल्वे व बसच्या तिकिटांचं आरक्षण केलं जातं. हे आरक्षण न मिळाल्यास भाविक खासगी वाहने करून गावाला जातात. मात्र, त्यामुळं त्यांच्यावर मोठा आर्थिक भार पडतो. टोलमाफीमुळं त्यांच्यावरील हा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

गणेशोत्सव कधी?

यंदा अधिक मासामुळं गणेशोत्सव थोडा लांबणीवर पडला आहे. येत्या १९ सप्टेंबरपासून बाप्पाचा हा उत्सव सुरू होत आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांनी देखील यासाठी जय्यत तयारी केली आहे. पाच दिवसांचे गौरी-गणपती यंदा २३ सप्टेंबरला जाणार आहेत. यंदा फक्त पाचच दिवस मिळत असल्यानं बाप्पाची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करावी यासाठी भक्तांनी तयारी केली आहे.

WhatsApp channel