सचिन तेंडुलकर यांनी जंगली रमीची जाहिरात केल्याच्या विरोधात सोलापुरातील अकोलेकाटी गावातील गणपती मंडळांपुढे चक्क भीकपेटी ठेवण्यात आली आहे. गणपती मंडळापुढे जमा झालेले पैसे भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना पाठवणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सोलापुरात सांगितले. एक प्रकारचा जुगार असणाऱ्या जंगली रमीची जाहिरात करणा-या महान खेळाडूस हे पैसे त्यांच्या घरी पाठवले जातील, असेही बच्चूकडू यांनी स्पष्ट केले.
बच्चू कडू सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी अनेक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना भेटी दिल्या.त्यानंतर एका मंडळापुढे ठेवलेल्या पेटीत स्वतः १०० रुपये टाकत सचिन तेंडुलकर यांना हे पैसे पाठवणार असल्याचं सांगत तेंडुलकरवर जोरदार टीका केली.
महाराष्ट्रातील प्रहार संघटनेच्या विचारांचे जितकी गणेश मंडळे आहेत, तिथे अशा भीक पेटी ठेवल्या जातील. यात जमा होणारे पैसे गणेश विसर्जन झाल्यानंतर सचिन तेंडुलकर यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचवले जातील, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी यावेळी दिला.
उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी या गावात मुस्लिम बांधवांनी गणपती मंडळाची स्थापना केली आहे. सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या मंडळाच्या गणरायाची आमदार बच्चू कडूंच्या हस्ते पूजा पार पडली. दरम्यान आमच्या गावाची लोकसंख्या ही पाच हजार आहे. मात्र आम्ही सर्व गुण्या गोविंदाने राहत आलोय. यंदा पहिल्यांदाच आम्ही मुस्लिम युवा गणेश मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव करतोय याचा आम्हाला आनंद असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.