अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर मुंबईतील दहा दिवसांच्या गणपती बाप्पाचं भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आलं. नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचं विसर्जन नेहमीप्रमाणे दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटीच्या समुद्रात बुधवारी पहाटे झालं. अंबानी यांनी बाप्पाला दिलेला २० किलोचा सोन्याचा मुकूट यावेळी उतरवण्यात आला.
लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी व लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी हजारो भाविकांनी विसर्जन मार्गावर व चौपाटीवर गर्दी केली होती. प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी हेही विसर्जन सोहळ्यात सहभागी झाले होते.
गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी करणारे अंबानी कुटुंबीय लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आवर्जून जात असतात. शनिवारी रात्री मुकेश अंबानी, अनंत अंबानी आणि पत्नी राधिका मर्चंट आणि श्लोका मेहता यांनी मंडपात जाऊन राजाची मनोभावे पूजा केली. त्याआधी अंबानी कुटुंबीयांनी राजाला २० किलो सोन्याचा मुकूट अर्पण केला होता. या मुकुटाची किंमत साधारण १५ कोटी रुपये होती. विसर्जनाच्या आधी हा मुकूट काढून ठेवण्यात आला.
अंबानी दाम्पत्यानं दक्षिण मुंबईतील अँटिलिया या आलिशान घरात गणेश चतुर्थीचा भव्य सोहळा आयोजित केला होता. या कुटुंबाच्या गणेशमूर्तीला भाविक प्रेमानं ‘अँटिलियाचा राजा’ म्हणून संबोधतात. अनिल आणि टीना अंबानी यांच्यासह अंबानी कुटुंबीय, तसेच बॉलिवूडमधील अनेक स्टार्स या सोहळ्याला उपस्थित होते. अंबानी कुटुंबीयांनी दीड दुसऱ्या दिवशी बाप्पाचं विसर्जन केलं. रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे विसर्जन सोहळ्यात सहभागी झाले होते. अंबानींच्या सूनबाई राधिका मर्चंट हिचा हा पहिला गणपती होता. विसर्जन मिरवणुकीत ठेका धरून तिनं हा गणपती गाजवला.