Ganesh Visarjan Government Warning: आज दीड दिवसांच्या गणरायाला भाविक निरोप देणार आहेत. मुंबईत समुद्रात प्रामुख्याने गणरायाचे विसर्जन केले जाते. मात्र, समुद्रात उतरतांना गणेश भक्तांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. समुद्रात धोकादायक मासे चावे घेण्याची शक्यता आहे. यामुळे गंभीर इजा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या वर्षी तब्बल ६७ गणेशभक्तांना मासे चावले होते. त्यामुळे या वर्षी देखील गणेश विसर्जनादरम्यान नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत आज दीड दिवसांच्या बाप्पांना मोठ्या प्रमाणात गणेश भक्त निरोप देणार आहेत. या साठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनेक किनारपट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात घरगुती गणरायांचं विसर्जन करण्यात येतं. विसर्जन करतांना समुद्राच्या पाण्यात जाणं गणेशभक्तांना महागात पडू शकतं. समुद्रातील धोकादायक मासे चवण्याची शक्यता आहे. हे मासे चवल्यास गंभीर इजा होण्याची शक्यता आहे. मत्स्य विभागाच्या ट्रायल नेटिंगमध्ये हे मासे आढळले आहेत. समुद्रात या माशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे समुद्रात उतरतांना काळजी घेण्याचे आवाहन मत्यस्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त यांनी दिले आहे.
मुंबईच्या समुद्र किनारी काही धोकादायक मासे आढळले आहेत. या बाबत दादर आणि गिरगाव येथील चौपाट्यांवर मत्स्य व्यवसाय विभागाने प्रायोगिक मासेमारी केली. यात प्रामुख्याने जेली फीश, ढोमी, कोळंबी, ब्लू जेली फिश, स्टिंग रे, शिंगटी, घोडा मासा, या सारखे धोकादायक मासे आढळले. हे मासे चावल्यास मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रात उतरतांना काळजी घेणे गरजेचे आहे.
गणेशमूर्तींचे विसर्जन हे मुंबई महानगरपालिकेमार्फत नेमून देण्यात आलेल्या जीवरक्षक व संबंधित यंत्रणेच्या माध्यमातूनच करावे. किंवा महापालिकेच्या फिरत्या हौदात विसर्जन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. या सोबतच विसर्जनाच्या वेळी उघड्या अंगाने समुद्रात जाऊ नये. विसर्जनच्या वेळी हे मासे पायांना चावण्याची शक्यता असल्याने गमबूटचा वापर करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.