गणेशोत्सवासाठी आता केवळ सहा दिवसांच्या अवधी शिल्लक राहिला असून सार्वजनिक मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गणेश आगमनाच्या मिरवणुकीची तयारी सुरू असतानाच मुंबई महापालिकेने पालिका हद्दीतील मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील १३ पूल धोकादायक स्वरूपाचेअसल्याचे जाहीर केले आहेत. काही पुलांच्या डागडुजीची कामे सुरू असून, काही पुलांची कामे पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे भाविकांनी गणेशोत्सवाच्या आगमन-विसर्जनाच्या मिरवणुकीवेळी या पुलांवरून जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
२०१८ मध्ये अंधेरीतील गोखले पूल कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर २०१९ मध्ये सीएसएमटी येथील ‘हिमालय’ पूल कोसळून ७ जणांचा बळी गेला होता. त्यानंतर मुंबईतील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे मुंबईतील सर्व ३४४ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती करण्यात आली. अतिधोकादायक पूल पाडून नव्याने बांधण्याचे धोरण आखण्यात आले. मात्र काही जुन्या पुलांचा वापर अजूनही केला जात आहे. गणेशोत्सव काळात या पुलांचा वापर करताना खबरदारी बाळगावी, यासाठी पालिकेने त्यांची यादी जाहीर केली आहे.
गणपतीच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीसाठी शहर सज्ज झाले असतानाच शहर आणि उपनगरातील १३ विशिष्ट पूल ओलांडताना भाविकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर असलेल्या या पुलांची दुरवस्था झाल्याने ते धोकादायक म्हणून ओळखले गेले आहेत. या पुलांवर एकाच वेळी जास्त वजन येऊ नये, तसेच या पुलांवर नाचण्यासाठी लाऊडस्पीकरचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, पूल ओलांडल्यानंतरच लाउडस्पीकरचा वापर व जल्लोष केला जावा, असा सल्ला महापालिकेने दिला आहे. यातील काही बांधकामांच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे, तर काही बांधकामांची देखभाल पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे.
घाटकोपर रेल्वे ओव्हर ब्रिज, करी रोड रेल्वे ओव्हर ब्रिज, आर्थर रोड रेल्वे ओव्हर ब्रिज (चिंचपोकळी रेल्वे ओव्हर ब्रिज), भायखळा रेल्वे ओव्हर ब्रिज आणि शिव (सायन) स्टेशन रेल्वे ओव्हर ब्रिज या पुलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
मरीन लाइन्स रेल्वे ओव्हर ब्रिज, सँडहर्स्ट रोड रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रँट रोड ते चर्नी रोड दरम्यान), फ्रेंच रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रँट रोड ते चर्नी रोड दरम्यान), केनेडी रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रँट रोड ते चर्नी रोड दरम्यान), फॉकलंड रेल्वे ओव्हर ब्रिज (ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान), ओलांडताना भाविकांनी सावध गिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महालक्ष्मी स्टेशन रेल्वे ओव्हर ब्रिज, प्रभादेवी-कॅरोल रेल्वे ओव्हर ब्रिज आणि दादर येथील लोकमान्य टिळक रेल्वे ओव्हर ब्रिज.
तसेच भाविकांनी पुलांवर गर्दी टाळावी, अनावश्यक विलंब न करता तत्परतेने पुलावरून जावे, पोलिस व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.