Lalbaugcha Raja : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी गणेश चतुर्थीनिमित्त सपत्नीक लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. माजी मंत्री व आमदार आदित्य ठाकरे हे देखील यावेळी उपस्थित होते.
देशभरात पुढचे १० दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. घरोघरी गणराय विराजमान झाले आहेत. सार्वजनिक मंडळांचे बाप्पाही विराजमान झाले असून दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे.
राज्यातील अनेक राजकारण्यांच्या घरी गणपती बाप्पा येत असतात. तसंच, राजकीय मंडळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेटी देत असतात. यात नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन कुणीही चुकवत नाही.
उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्याच दिवशी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे व आदित्य ठाकरे राजाच्या चरणी नतमस्तक झाले. या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर आहे. त्यात ठाकरे कुटुंबीय गर्दीतून वाट काढत स्टेजवर जाताना दिसत आहेत.
गणेश चतुर्थीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी सहकुटुंब गणपती बाप्पाची पूजाअर्चा केली. तसंच, ठाण्यातील किसन नगर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरतीमध्येही सहभाग घेतला.
महाराष्ट्रात गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे. सर्वजण बाप्पाची आतुरतेनं वाट पाहत होते. गणेश चतुर्थीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. गणराया सर्वांसाठी सुख-समृद्धी घेऊन येवो. बळीराजावरील संकट दूर होवो. शेती चांगली होऊ दे,' अशा सदिच्छा यावेळी शिंदे यांनी व्यक्त केल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या घरी गणपती बाप्पांचं स्वागत केलं व मनोभावे पूजा केली.
मुंबई शहरातील गणेशोत्सव हा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. लालबागचा राजा, खेतवाडीचा गणराज, गणेश गल्ली, मुंबईचा राजा, अंधेरीचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी हे मुंबईतील प्रमुख गणपती मंडळं आहेत. विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी या मंडळांना भेटी देऊन बाप्पाचं दर्शन घेत असतात. अभिनेता कार्तिक आर्यन यानं आज राजाचं दर्शन घेऊन प्रार्थना केली. पहिले पाच दिवस घरगुती गणपती आहेत. त्यामुळं बहुतेक लोक घरीच गणरायाच्या सेवेत आहे. पाच दिवसांचे बाप्पा गेल्यानंतर सार्वजनिक गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळणार आहे.
गणेश चतुर्थीनिमित्त लालबागच्या राजाला अनंत अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशननं २० किलो सोन्याचा मुकुट भेट म्हणून दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोन्याचा मुकुट तयार करण्यासाठी दोन महिन्यांहून अधिक कालावधी लागला.