Ganeshostav 2024: मुंबईसह महाराष्ट्रात शनिवारपासून (७ सप्टेंबर २०२४) गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. शनिवारी सकाळपासून घरोघरी व सार्वजनिक मंडळांच्या गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळ लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी लालबागचा राजाला भाविकांनी अर्पण केलेल्या दानाची मोजदाद पूर्ण झाली. गणेश मंडळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी लालबागच्या राजाला एकूण ४८ लाख ३० हजार रुपयांची देणगी मिळाली आहे, यात रोख रक्कम आणि सोने- चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.
गणेशोत्सवाला शनिवारपासून सुरुवात होत झाली असून सर्वांच्या नजरा मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध गणेशमूर्ती लालबागचा राजाकडे लागल्या आहेत. सेलिब्रिटींपासून ते राजकारण्यांपर्यंत लोक लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी जातात.दरम्यान, लालबागचा राजाच्या दर्शनासाठी गेलेले भाविक आपपल्या आर्थिक परिस्थितीनुसार दान करत आहेत. नुकतेच उद्योगपती अनंत अंबानी यांनी गणेश चतुर्थीसाठी मुंबईच्या लालबागच्या राजाला १५ कोटी रुपये किंमतीचा २० किलो सोन्याचा मुकुट दान केला आहे. लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या या दान स्वरुपी नीधीचा उपयोग अनेक सामाजिक उपक्रमांत वापरला जातो.
गणेशोत्सवादरम्यान मुंबईत सुरक्षेसाठी सुमारे १५ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यात ३२ पोलीस उपायुक्त, ४५ सहाय्यक आयुक्त, २ हजार ४३५ अधिकारी, १२ हजार ४२० कॉन्स्टेबल, होमगार्ड आणि राज्य राखीव पोलिस दल, जलद कृती दल आणि दंगल नियंत्रण युनिटचे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती पीटीआयने दिली.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९३४ मध्ये झाली. हे गणेश मंडळ १० दिवसांसाठी गणेशमूर्तीची स्थापना करतात. नवसाला पावणारा गणपती अशी लालबागचा राजाचे ख्याती आहे. लालबागच्या गणेशमूर्तीचे विसर्जन दहाव्या दिवशी गिरगाव चौपाटीवर होते. मच्छिमारांनी या मंडळाची स्थापना केली होती. अनेकांच्या मनोकामना येथे पूर्ण झाल्यामुळे गर्दी वाढू लागली. दुसरे कारण म्हणजे मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला गणेश गल्लीतील गणपती लालबागचा राजाच्या शेजारीच आहे. यामुळे मुंबईच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी आलेले भाविक लालबागच्या राजाचेही दर्शनासाठी जाऊ लागले. त्यानंतर लालबागचा राजालाही प्रचंड गर्दी होऊ लागली, असेही बोलले जात आहे.लागले आणि तिथेही लांबच लांब रांगा लागल्या.