Anandacha Shida : गणपती आले, आनंदाचा शिधा आला का? गृहिणींची एकमेकींना विचारणा-ganapati has come has the anandacha shidha arrived housewives ask each other ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Anandacha Shida : गणपती आले, आनंदाचा शिधा आला का? गृहिणींची एकमेकींना विचारणा

Anandacha Shida : गणपती आले, आनंदाचा शिधा आला का? गृहिणींची एकमेकींना विचारणा

Sep 08, 2024 12:11 AM IST

Anandacha Shidha : राज्य सरकारतर्फे सणासुदीला गरजू व गरीब नागरिकांना आनंदाचा शिधा देण्याचे घोषित केले होते. मात्र, गणेशोत्सव आज पासून सुरू झाला तरी अद्याप नागरिकांना हा शिधा वाटला गेलेला नाही.

गणपती आले, आनंदाचा शिधा आला का? गृहिणींची एकमेकींना विचारणा
गणपती आले, आनंदाचा शिधा आला का? गृहिणींची एकमेकींना विचारणा

Anandacha Shidha : दिवाळी, दसरा, गुढीपाडव्या सारख्या सणासुदीला राज्यातील गरीब व गरजू शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ ही योजना राज्य सरकारतर्फे सुरू करण्यात आली आहे. या योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद लाभत असल्याने ही योजना वर्षभर राबविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे व गौरींचे आगमन दोन दिवसांवर आले असले तरी गरजू नागरिकांना या शिधाचे वाटप झालेले नाही, त्यामुळे आनंदाचा शिधा मिळाला का गं बाई ? असा प्रश्न महिला एकमेकीना करू लागल्या आहेत.

राज्यातील नागरिकांना गणपती सणानिमित्त सरकारकडून आनंदाचा शिधा दिला जाणार असल्याचं नुकतचं घोषित करण्यात आले होते. लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे दोन महिने बंद असणारा हा आनंदाचा शिधा गणेशोत्सवात मिळणार असल्याने नागरिक खुश होते. या आनंदाचा शिधा वाटपासाठी सरकारकडून तब्बल ५६२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या राज्यातील अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने आदेश जारी देखील केले होते. मात्र, गणरायचे आगमन झाले असून व गौरीचे आगमन जवळ आले असतांना राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील गरजू व्यक्तिंना हा आनंदाचा शिधा अद्याप मिळालेला नाही.

अंत्योदय अन्न योजनेतील एक कोटी ५८ लाख लाभार्थींना संजीवनी ठरणारी ही योजना गेल्या वर्षी जून महिन्यात शिंदे फडणवीस सरकारने ऑक्टोबर महिन्यात आलेल्या पहिल्या दिवाळीत आनंदाचा शिधा संकल्पना प्रत्यक्षात आणली.

गेल्या वेळेला, एक कोटी ५८ लाख ३३ हजार ७१९ पिवळा व केसरी शिधापत्रिकाधारकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या वर्षी हा शिधा १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या महिन्याच्या कालावधीत ई- पास प्रणालीद्वारे वाटप केला जाणार होता. यामार्फत द्रारिद्र्यरेषेखालील केशरी शिधापत्रिका असणाऱ्या नागरिकांना सवलतीच्या दरात हा आनंदाचा शिधा वाटप केला जाणार होता. मात्र, अद्याप हा शिधा राज्यातील अनेक जिल्ह्यातील गरजू नागरिकांना मिळालेला नाही.

आनंदाच्या शिधात काय मिळणार?

सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या या आनंदाच्या शिधात नागरिकांना यंदा एक किलो चणाडाळ, साखर व एक लिटर सोयाबीन तेल देण्यात येणार आहे. हा शिधा राज्यातील अत्योदय अन्न योजना आणि प्राधान्यक्रम कुटुंब शिधापत्रकांना मिळणार आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील द्रारिद्य रेषेखालील केशरी रेशनकार्ड असणाऱ्यांना सवलतीच्या दरात खाद्यवस्तू उपलब्ध करुन दिला जाणार आहे. राज्यातील १,७०,८२,०८६ शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे.

Whats_app_banner
विभाग